फलटण टुडे (फलटण), दि. 27 :
सातारा जिल्ह्यातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक आपण आयोजित करावी, अशी मागणी विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे, अशी माहिती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आळंदी – पंढरपूर हा पालखी महामार्गावरील तांबमाळ येथून ते फलटण सातारा रोड ते फलटण औंध रोड असा रस्ता तयार करण्यात यावा. यासोबतच नव्याने होणाऱ्या पुणे बेंगलोर ग्रीन फिल्ड हायवेवर असणाऱ्या सालपे याठिकाणी व्यावसायिक वसाहत निर्माण करण्यात यावी. यामुळे तालुक्यातील अनेक बेरोजरांच्या हाताला काम मिळेल व नूतन व्यावसायिक तयार होतील, अशीही मागणी केली असल्याची माहिती यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
पालखी महामार्गावरील तांबमाळ ते वाठार निंबाळकर फाटा व अब्दागिरेवाडी ते झिरपवाडी असा नूतन रस्ता तयार करून फलटण ते सातारा मार्गास पालखी मार्ग जोडण्यात यावा. फलटण ते सांगली रस्ता हा पालखी महामार्गास जोडण्यात यावा. यामुळे प्रस्तावित असलेल्या रिंग रोड पूर्णत्वास जाईल, अशी सुद्धा मागणी ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली असल्याची माहिती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
वेळे – सोळशी – सोनके – पिंपोडे बु. – तडवळे असा रस्ता तयार करून सदरील रस्ता हा पुणे ते बंगलोर महामार्गास जोडण्यात यावा. यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून विशेष निधी मंजूर करण्यात यावा. यासोबतच शिरवळ ते लोणंद या रस्त्याचे अर्धवट राहिलेले काम पूर्णत्वास नेहण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत, अशी सुद्धा मागणी ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली असल्याची माहिती श्रीमंत रामराजे यांनी यावेळी दिली.
फलटण शहरातील असणाऱ्या रिंग रोड म्हणजेच मुधोजी कॉलेज – विमानतळ – पृथ्वी चौक – नाना पाटील चौक या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात यावे व सुशोभीकरण सुद्धा करण्यात यावे; यामुळे फलटण शहराच्या वैभवात भर पडेल; त्यासाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली असल्याची माहिती श्रीमंत रामराजे यांनी यावेळी दिली.