फलटण टुडे ( फलटण ) दि २८ :
फलटण शहराला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभला आहे. शहर आणि परिसर शैक्षणिक, कृषी औद्योगिक प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करीत असताना शहराचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा जपला गेला पाहिजे किंबहुना तो वृध्दींगत झाला पाहिजे.
या बदलत्या काळात समाजाची सांस्कृतिक जडणघडण आणि संस्कारमूल्ये यांचाही विचार होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने २०२० पासून कला प्रसारक संस्था आणि गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांनी पुढाकार घेऊन फलटण संस्थान हेरिटेज संगीत महोत्सवाची सुरुवात केली असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी निदर्शनास आणून दिले.
यावर्षी हा महोत्त्सव रविवार दि.२९ जानेवारी रोजी मुधोजी हायस्कूल, फलटण येथे आयोजित केला आहे. त्या माध्यमातून गायन, वादन आणि नृत्य अशी परिपूर्ण, कोणीही चुकवू नये अशी सांगीतिक मेजवानी यानिमित्ताने फलटणकर व परिसरातील रसिक प्रेक्षकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे नियोजन कला प्रसारक संस्थेच्या संस्थापिका सौ.भाग्यश्री संजीवन गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून या महोत्सवातील एका सत्रामध्ये सुप्रसिद्ध गायिका सावनी शेंडे यांचे बहारदार गायन आणि दुसऱ्या सत्रामध्ये अनुप कुलथे, निखिल पटवर्धन आणि राहुल आचार्य यांची व्हायोलिन, सतार आणि तबल्यावरील आकर्षक जुगलबंदी सादर होईल. याशिवाय राजसी वाघ यांच्या भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचीही झलक अनुभवण्यास मिळणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन आकाशवाणीचे सुप्रसिद्ध निवेदक संजय भुजबळ करणार आहेत.
शांतीकाका सराफ यांचे रिंग रोडवरील नवे दालन, बुलढाणा अर्बन पतसंस्था, जोशी हॉस्पिटल्स, के.बी.एक्सपोर्टस, दिशा अकॅडमी आणि ग्रीनफील्ड ऍग्रीकेम हे या महोत्सवाचे सहप्रायोजक असणार आहेत.
या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे मोफत प्रवेश पास प्रायोजक आणि सहप्रायोजक यांच्या कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. फलटण शहर व परिसरातील अधिकाधिक रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) आणि सर्व प्रायोजकांनी केले आहे.
फलटण शहरातील मुधोजी हायस्कूल या मध्यवर्ती प्रशस्त जागेत, वाहन तळ सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी होत असलेल्या या महोत्सवाद्वारे शास्त्रीय गायन, अभंग, चित्रपट संगीत, वाद्यवादन जुगलबंदी आणि नृत्याच्या मेजवानीचा आनंद घेत फलटण शहराचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा वृध्दींगत करण्याची संधी या निमित्ताने लाभणार असून फलटण व पंचक्रोशीतील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.