कुष्ठरोग जनजागृती अभियान

           

            राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी 30 जानेवारी रोजी आहे. या निमित्ताने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 या पंधरवड्यात आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालयामार्फत विविध आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या जनजागृती अभियानाविषयी ……

 
          या अभियानामध्ये जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांनी तयार केलेल्या कुष्ठरोगाबाबतच्या घोषणापत्राचे ग्रामप्रमुख सरपंच यांच्यामार्फत वाचन करण्यात येणार आहे. स्पर्श अभियानाबाबत ग्रामप्रमुख, सरपंच यांचे मार्गदर्शन होणार आहे. कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञा घेणे, गावातील प्रौढ व्यक्तीस राष्ट्रपिता महात्मा गांधी (बापू) पेहराव करुन त्यांच्यामार्फत अथवा शाळकरी मुलीमार्फत कुष्ठरोग विषयक माहिती व संदेश देण्यात येणार आहे. रोगमुक्त कुष्ठरुग्णांना ग्रामसभेस प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात येणार आहे. कुष्ठबाधीत व्यक्ती उपलब्ध झाल्यास त्यांचा सत्कार व त्यांच्यामार्फत कुष्ठरोगविषयक संदेशाचे वाचन करण्यात येणार आहे.
जनजागृती
            पंधरवड्यात शाळेमध्ये प्रार्थनेनंतर कुष्ठरोग बाबतच्या प्रतिज्ञाचे वाचन, शाळेतील सूचना फलकावर कुष्ठरोग बाबतचे संदेश लिहणे, शाळेमध्ये नुक्कड-नाटक, प्रश्नमंजूषा, निबंध स्पर्धा, कुष्ठरोगावरील गाणी, कवितावाचन, रांगोळी, चित्रकला स्पर्धा. प्रभात फेरी, लवकरच निदान व वेळेवर उपचाराचे महत्व तसेच कुष्ठरोगाविषयीचे गैरसमज या विषयी माहिती देण्याबरोबरच स्थानिक महिला मंडळे, बचत गट, तरुण मंडळे यांच्या सभा, खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्या कार्यशाळा, बाजाराच्या ठिकाणी प्रदर्शन व आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून या रोगाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
 
           
 
स्पर्श जनजागृती अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये राबविण्याच्या विविध कृतीबाबत वेळापत्रकानुसार सुक्ष्म कृती योजना तयार करण्यात येणार आहे. पर्यवेक्षणांकरिता तपासणी सूची तयार करण्यात येणार आहे. जनजागृती अभियानाकरिता आवश्यक विविध संसाधना (स्त्रोत) साठी विविध शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी संस्था यांच्याशी समन्वय साधण्यात येणार आहे. आशा कार्यकर्ती व आरोग्य कर्मचारी यांची सभा घेवून अभियानाबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहे. सर्व उपक्रम पंचायत समिती, ग्रामपंचायत, ग्राम विकास, नागरी विकास, माता व बाल संगोपन केंद्र, सामाजिक न्याय विभाग व शालेय शिक्षण विभाग या विभागांच्या सहकार्याने आरोग्य सेवक, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, आशा, अंगणवाडी ताई इत्यादी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने व वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविण्यात येणार .
            स्पर्श जनजागृती अभियानासंबंधी बैठका घेऊन तसेच इतर विभागांशी समन्वय साधून त्यांचा सहभाग वाढविणार आहेत. अभियान गुणवत्तापूर्ण होण्यासाठी योग्य त्या उपाययोजनेकडे लक्ष देणार आहे. जिल्हास्तरावरील कार्यशाळा, बैठका, प्रशिक्षणास उपस्थित राहून जिल्हा शल्यचिकित्सक मार्गदर्शन करणार आहेत. शहरी भागात स्पर्श जनजागरण अभियानांतर्गत कुष्ठरोगाबाबत विविध आरोग्य शिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याकरिता संबंधितांना मार्गदर्शन व सहकार्य करणार आहेत.
कुष्ठरोगाची लक्षणे
            त्वचेवरील बऱ्याच दिवसाचा फिकट किंवा लालसर रंगाचा डाग किंवा चट्टा. तेलकट, लालसर, गुळगुळीत व चमकदार त्वचा आणि गाठी, तळहात, तळपायात सुन्नपणा व शारिरीक विकृती अशी लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब नजिकच्या आरोग्य केंद्राशी, गावातील आशाताई किंवा आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून कुष्ठरोग आहे किंवा नाही याची खात्री करावी. एम.डी.टी. हे औषध प्रभावशाली आहे. हे सर्व सरकारी दवाखाने व आरोग्य केंद्रामध्ये मोफत उपलब्ध आहे. नियमित औषधोपचाराने कुठल्याही स्थितीतील कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. कुष्ठरोगाच्या लवकर निदानाने व नियमित उपचाराने शारिरीक विकृत व विद्रुपता निश्चित टाळता येते.
            स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानामध्ये लवकर निदान व लवकर उपचाराचे महत्व सांगून समाजामध्ये कुष्ठरोगाबाबतची शास्त्रीय माहिती देण्यावर भर देण्यात येणार आहे. कुष्ठरोगाचे संशयित लक्षण असलेल्या व्यक्तीने जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जावे. कुष्ठरोग आढळल्यास रुग्णाला मोफत उपचार केले जातात.
नागरिकांनी कुष्ठरोगी असलेल्या रुग्णासोबत बसणे, खाणे, फिरणे याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करु नये. रुग्णासोबत कोणत्याही प्रकारे सामाजिक भेदभाव होणार नाही यासाठी प्रयत्नशील रहावे. कुष्ठरोग मुक्त भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील रहावे.
                                                                                       जिल्हा माहिती कार्यालय, सातारा
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!