फलटण टुडे ( सातारा ) दि. 25 :
राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृध्दींगत होण्याच्या दृष्टीने सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलून महापुरुषांची व लोकशाही मुल्यांशी निगडीत नावे देणे बाबत सुचित केलेले आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलून नविन नावे देण्याची कार्यपध्दती दिलेली आहे. त्यानुसार संबधितत गावचे ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक यांनी येत्या प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेमध्ये ठराव संमत करुन प्रस्ताव पंचायत समिती मार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा या कार्यालयाशी समन्वय साधून जिल्हा परिषदेकडे सादर करावा व जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व ठराव एकत्रित करुन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सातारा यांच्या मार्फत विभागीय आयुक्त कार्यालयास पुढील कार्यवाहीस्तव सादर करावेत. या प्रक्रियेत जिल्ह्यातील जातीवाचक नाव असलेले कोणतेही गाव, वस्ती व रस्ता या पासून दुर्लक्षित राहणार नाही याबाबतची दक्षता संबंधित गट विकास अधिकारी यांनी घेवून जातीवाचक नावे बदलण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावांबाबतचा अहवाल जिल्हास्तरीय समितीस सादर करावा, असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कळविले आहे.