पश्चिम रेल्वेचा विहंग मंडळावर थरारक विजय विद्यार्थी क्रीडा केंद्राची राज्यस्तरीय खो- खो स्पर्धा

मुंबई, ( फलटण टुडे वृत्तसेवा )ता २५ : 
परळच्या विद्यार्थी क्रीडा केंद्रातर्फे लाल मैदानात माजी खासदार स्व. मोहन रावले स्मृती चषकासाठी आयोजित केलेल्या निमंत्रित राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत पुरुष गटात उपांत्य पूर्व फेरीच्या थरारक लढतीत बलाढ्य पश्चिम रेल्वेने ठाण्याच्या विहंग क्रीडा मंडळाचा अखेर लघुत्तम आक्रमणात पराभव करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. आता उपांत्य फेरीत पश्चिम रेल्वेचा मुकाबला मुंबई उपनगरच्या महात्मा गांधी संघाशी होईल. तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना पुण्याचा नव महाराष्ट्र संघ आणि मध्य रेल्वे यांच्यात रंगेल. 

 पश्चिम रेल्वे विरूद्ध विहंग यांच्यातील पहिल्या डावात पश्चिम रेल्वेने ५-४ अशी १ गुणाची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात रेल्वेचे ५ आणि विहंगचे ६ गुण झाल्यामुळे दोन्ही संघांची १०-१० गुणांची बरोबरी झाली. त्यामुळे सामना पुढे अलहिदा डावात खेळवण्यात आला. त्यात देखील दोन्ही संघांचे ६-६ असे समान गुण झाले. मग ही बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी लघुत्तम आक्रमणाच्या नियमाचा वापर सामन्यात करण्यात आला. त्यामध्ये अखेर पश्चिम रेल्वे संघाने बाजी मारली. रेल्वेच्या दिपक माधवने १मिनिट ७.१० सेकंदाचा पळतीचा खेळ करून रेल्वेला चांगली सुरुवात करून दिली. विहंगच्या आकाश तोगरेला १ मिनिट ५.७५ सेकंदाचा पळतीचा खेळ करता आला. त्याला प्रसाद राडियेने अखेर बाद करून रेल्वेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या अटीतटीच्या लढतीत रेल्वेकडून महेश शिंदे, दिपक माधव, मनोज पगार, मजहर जमादार यांनी शानदार खेळ केला. तर विहंगतर्फे आकाश तोगडे, लक्ष्मण गवस, आदित्य कांबळे, आकाश साळवे यांनी देखील आपल्या सुरेख खेळाची झलक दाखवली. 

दुसऱ्या सामन्यात पुण्याच्या नव महाराष्ट्र संघाने उस्मानाबादच्या छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाचा साडेसात मिनिटे राखून आणि २ गुणांनी आरामात पराभव केला. आदित्य गणपुले, मिलिंद कुरपे, स्वप्निल पाटणकर, शिवराम शिंगाडे विजयी संघातर्फे छान खेळले. पराभूत संघाचे अनिकेत पवार, विजय शिंदे चमकले. 

शिर्सेकर महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीने मुंबई पोलिसांना १८-११ गुणांनी सहज पराभूत करून उपांत्य फेरीत मजल मारली. ओमकार सोनावणे, निहार दुबळे, अनिकेत पोटे, ऋषिकेश मुर्चावडे महात्मा गांधींच्या विजयाचे शिल्पकार ठरले. पराभूत संघाच्या अक्षय खापरे, विशाल गायकवाड, अमोल जाधवची झुंज एकाएकी ठरली. 

४ फूट ११ इंच कुमार गटाच्या सामन्यात विहंग विरुद्ध महात्मा गांधी, नवशक्ती विरुद्ध विद्यार्थी, नंदादीप विरुद्ध ओम साईश्वर आणि युवक विरुद्ध फादर अॅग्नल असे उप उपांत्य फेरीचे सामने रंगतील. ओमकार जाधव, अनिष कदम, पवन मडव यांच्या शानदार खेळाच्या जोरावर यजमान विद्यार्थी क्रीडा केंद्राने प्रबोधन क्रीडा भवनचा आरामात पराभव केला. आणखी एका सामन्यात युवक क्रीडा मंडळाने ओम युवा स्पोर्ट्स क्लबला देखील सहज नमवले. कार्तिक जोंधळे, यश यादव युवक तर्फे चमकले. पराभूत संघाचे गणेश कांबळे, लोकेश सोनार यांनी चांगला खेळ केला.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!