मुंबई, ( फलटण टुडे क्रीडा वृत्तसेवा ) ता 24 : – परळच्या विद्यार्थी क्रीडा केंद्रातर्फे लाल मैदानात माजी खासदार स्व. मोहन रावले स्मृती चषकासाठी आयोजित केलेल्या निमंत्रित राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत पुरुष गटात बलाढ्य मध्य रेल्वे संघाला ठाण्याच्या विहंग क्रीडा मंडळाने १२-१२ असे समान गुणांनी बरोबरीत रोखून त्यांना विजयापासून दूर ठेवले.
क गटातील या रंगतदार लढतात विश्रांतीला ३ गुणांची आघाडी घेणाऱ्या विहंगला त्या आघाडीचा फायदा मात्र घेता आला नाही. विहंगतर्फे लक्ष्मण गवस, आदित्य कांबळे, आकाश कदम यांनी शानदार अष्टपैलू खेळाची चमक दाखवली तर आकाश साळवेने दोन्ही डावात पळतीचा छान खेळ केला. मध्य रेल्वेतर्फे विजय हजारे, दिनेश मोरे, मिलिंद चावरेकर, उत्तम सावंत यांनी सुरेख अष्टपैलू खेळ केला.
याच गटात आपल्या सलामीच्या लढतीत विहंगने आकाश साळवे, आकाश कदम, लक्ष्मण गवस, आदित्य कांबळे या चौघांच्या शानदार खेळाच्या जोरावर यजमान विद्यार्थी क्रिडा केंद्राला ५ गुणांनी सहज नमवले. विद्यार्थी तर्फे विश्वजित कांबळे, शुभम शिंदेची लढत एकाकी ठरली.
अ गटात आपला सलग दुसरा विजय मिळवताना पश्चिम रेल्वेने थरारक लढतीत कुपवाडच्या राणा प्रताप मंडळाचा १ गुणांनी पराभव केला. विश्रांतीला १ गुणाची आघाडी रेल्वे संघाने घेतली होती. अष्टपैलू खेळ करणारे प्रसाद राडीये, दिपक माधव, महेश शिंदे, मजहर जमादार त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. राणा प्रतापतर्फे सौरभ घाडगे, शनिराजे हारगे, काशीलिंग हिरेकुर्ब यांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. आपल्या सलामीच्या लढतात या दोन्ही संघांनी नाशिकच्या संस्कृती क्रीडा मंडळाचा पराभव केला होता.
ड गटात उस्मानाबादच्या छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा १ डाव २ गुणांनी दणदणीत पराभव करून आपला पहिला विजय मिळवला. निखिल मस्के, विजय शिंदे, अनिकेत पवार यांनी आक्रमण आणि संरक्षणात शानदार चमक दाखवून आपल्या संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. सोहन गुंडने आक्रमणात ४ गडी टिपले. पराभूत संघातर्फे प्रतिक वाईकर, मिलिंद बागवे छान खेळले. सलामीच्या सामन्यात छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाला महात्मा गांधीकडून हार खावी लागली होती.
क गटात मुंबई पोलिसांनी जोरदार विजयी सलामी देताना सोलापूरच्या उत्कर्ष क्रीडा मंडळाला १० गुणांनी आरामात नमवले. अक्षय निरगळ, सुनिल मोरे, अक्षय खापरे, विशाल गायकवाड, मनोज वैद्य यांनी प्रेक्षणिय खेळ करून मुंबई पोलिस संघाला सहज विजय मिळवून दिला. उत्कर्षतर्फे निखिल कापरे, उबेर शेख, लक्ष्मण वाघमारे चमकले. सलामीच्या सामन्यात उत्कर्षला नव महाराष्ट्रकडून हार खावी लागली होती.
४फूट ११ इंच या कुमार गटाच्या सामन्यात विहंगने दत्त सेवाचा, महात्मा गांधीने वैभवचा, नव शक्तीने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराचा, नंदादीपने श्री समर्थ व्यायाम मंदिराचा, ओम साईश्वरने ग्रिफिन जिमखान्याचा आणि फादर एग्नलने सरस्वती स्पोर्ट्स क्लबचा पराभव केला.