डोर्लेवाडी (ता.बारामती): येथील विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित सभेत बोलताना वोरोधी पक्ष नेते अजित पवार व उपस्थित जनसमुदाय
बारामती दि १६ ( फलटण टुडे वृत्तसेवा ): –
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान महत्वपूर्ण आहे.त्यांचे बलिदान समाज कधीच विसरू शकत नाही. स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचे अनुकरण करत असतानाच आजच्या तरुणांनी आपल्या कार्याचा इतरांना अभिमान वाटावा असे काम केले पाहिजे.असे मत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले.
ग्रामपंचायत डोर्लेवाडी (ता.बारामती) यांच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक स्मृती स्तंभ,राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत नागरी सुविधा केंद्र व इतर विकासकामांचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी सभेत बोलत होते.यावेळी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे,छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, दुध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप योगेश जगताप,मदनराव देवकाते सचिन सातव सरपंच पांडुरंग सलवदे,उपसरपंच संदीप नाळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारामती तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विकासकामे करण्याचा आमचा नेहमीच मानस राहिला आहे.अनेक वर्षांपासून येथील जनतेनी पवार कुटुंबियांना नेहमीच साथ दिली आहे.त्यामुळे जनतेची कामे करणे हे आमचे कर्तव्य समजून आम्ही नेहमीच मदत करीत आलो आहोत.नागरिकांनीदेखील गावातील मुलभूत विकासकामे करीत असताना गट तट बाजूला ठेवून सहकार्य करण्याची भूमिका ठेवली पाहिजे.
बारामती ते सोनगाव पर्यंत नदीचे खोलीकरण आदी कामे पुढील टप्यात करण्यात येणार आहेत.त्यामुळे नदीपात्रात कोणीही अतिक्रमणे करू नयेत.बारामती ग्रामीण भागात होत असलेल्या अवैध ताडी व दारू विक्री बाबत अनेक तक्रारी येत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना दिल्या.यावेळी पवार यांच्या हस्ते अल्पसंख्यांक विकास मंच फलक अनावरण,मोफत कायदा सल्ला केंद्र कार्यालय उद्घाटन, सरपंच पांडुरंग सलवदे यांना आदर्श सरपंच पुरस्कार,जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक साहेबराव दळवी व कुस्तीपटू स्वप्नील शेलार यांच्या सत्कार करण्यात आला.सोमनाथ भिले यांनी प्रास्ताविक केले.कुमार देवकाते यांनी सुत्रसंचालन व आभार मानले.