सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक स्वागत
पुणे दि.१६ ( फलटण टुडे वृत्तसेवा ) :-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये जी-२० राष्ट्रांच्या परिषदेच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज, विभागीय आयुक्त सौरभ राव, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपायुक्त श्रीमती वर्षा लढ्ढा आदी उपस्थित होते.
‘जी-२०’ राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या ‘इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप’ची दोन दिवसीय बैठक पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून विद्यापीठ परिसरात चर्चासत्राच्या निमित्ताने विविध राष्ट्रांचे प्रतिनिधी आले असता सुरुवातीला त्यांच्या हस्ते, विद्यापीठात वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये कडुनिंब, सोनचाफा, ताम्हण, बकुळ, सप्तपर्णी, मुचकुंद आदी वृक्षांचा समावेश आहे. वृक्षारोपण प्रसंगी काही राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी वृक्षांची माहिती औत्सुक्याने जाणून घेतली.
अतिथी प्रतिनिधींचे मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने स्वागत
विद्यापीठामध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानंतर अतिथी प्रतिनिधींचे चर्चासत्राच्या मुख्य कार्यक्रमासाठी मुख्य इमारत परिसरात आगमन होताच मराठमोळे ढोल- ताशे, तुतारी, लेझीम वाद्याच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. या सुंदर अशा स्वागताने अतिथी भारावून गेले. त्यांनी उपस्थित सर्व कलाकारांचे अभिनंदन केले व काही कलाकारांशी मनमोकळा संवाद साधला. याप्रसंगी कलाकारांचा उत्साह ओसंडून वाहत होता. काही प्रतिनिधींनी जागीच फेटा बांधून घेतला व अवघ्या काही क्षणात फेटा बांधणाऱ्यांचेही कौतुक केले. काहींनी आपल्या मोबाईलमध्येही महाराष्ट्राची सांस्कृतिक छबी उत्साहाने टिपली.