फलटण तालुका संस्कृती महोत्सवा’चे उद्घाटन करताना आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर. समवेत रविंद्र बेडकिहाळ, दिनकर गांगल.
फलटण, दि.16 फलटण टुडे ) :
‘‘लोकशाही हा सिद्धांत असून या व्यवस्थेद्वारे आपल्याला मते मांडता येतात, सत्तांतर करता येते, विरोध करता येतो. आजवर राजकारणात राहून ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत लोकशाहीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात तत्कालिन फलटण संस्थानिकही याच विचाराचे होते. त्याकाळात फलटण संस्थानचे स्वतंत्र मंत्रिमंडळ होते. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकशाही रुजविण्याचा विचार राजेशाहीने केला हे फलटण संस्थानचे मोठे वैशिष्ठ्य आहे’’, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम आणि महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील महाराजा मंगल कार्यालयात आयोजित ‘फलटण तालुका संस्कृती महोत्सवा’चे उद्घाटन आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ, थिंक महाराष्ट्र डॉट कॉमचे प्रमुख दिनकर गांगल यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ.श्रीमंत रामराजे पुढे म्हणाले, ‘‘ या संस्कृती महोत्सवात राज्य निवडणूक कार्यालयाच्यावतीने पार पडणारा ‘लोकशाही गप्पा’ हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम ठरणार आहे. तरुणाईच्या जगात स्वप्न जास्त असतात, भविष्याचा विचार असतो. आमचे विचार व आजच्या तरुणांचे विचार यात आंतर पडले आहे. आज तंत्रज्ञान, शिक्षण, राजकारण अशी सर्वच क्षेत्रे बदलाच्या उंबरठ्यावर येऊन थांबली आहेत. अशा परिस्थितीत आजची लोकशाही व्यवस्था सर्वोत्तम आहे की नाही याची जाणीव तरुणांना होणे अशा कार्यक्रमातून अपेक्षित आहे. मतस्वातंत्र्य हे लोकशाही संकल्पनेचा पाया असून आज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मतपरिवर्तनाचा प्रयत्न केला जात आहे; हे लोकशाहीला घातक असून लोकशाही टिकवण्यासाठी युवकांनी सजग राहून लोकशाहीचा मुळ गाभा सांभाळून तो वाढवणे आवश्यक आहे. दोन दिवस आयोजित केलेल्या या महोत्सवात युवकांनी हिरीरीने सहभागी होवून आपले प्रश्न मांडावेत’’, असे आवाहनही आ.श्रीमंत रामराजे यांनी यावेळी केले.
रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, ‘‘राज्यातील ग्रामीण भागातील माहिती संकलनाच्या उपक्रमात फलटण तालुक्याचा समावेश थिंक महाराष्ट्र डॉट कॉम ने केला हे अभिनंदनीय आहे. संपूर्ण महाराष्ट्र आणि ग्रामीण संस्कृती संकलित करण्याची ‘थिंक महाराष्ट्र’ची ही लोकोपयोगी मोहिम असून फलटण तालुक्यातील सर्व गावातील माहिती संकलित करण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुढाकार घेईल व ही माहिती लवकरच पुस्तिका स्वरुपात प्रसिद्ध केली जाईल.’’
प्रास्ताविकात दिनकर गांगल यांनी, ‘‘महाराष्ट्रातील 45 हजार खेड्यांची माहिती संकलित करण्याचा उपक्रम ‘थिंक महाराष्ट्र’ ने हाती घेतला आहे. या अंतर्गत प्रत्येक गावातील कर्तबगार व्यक्ती, उपक्रमशील संस्था, धार्मिक स्थळे यांची माहिती घेतली जाणार आहे. त्याच अनुषंगाने ‘फलटण तालुका संस्कृती महोत्सवा’चे आयोजन केले असून ज्ञानाचा संचय हा या संस्कृती महोत्सवाचा गाभा आहे. यातून पारंपारिक मुल्यांचा वेध घेणे, स्वातंत्र्य, समता याचे विचार मांडले जाणार आहेत’’, असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.हेमलता गुंजवटे यांनी केले तर आभार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अमर शेंडे यांनी मानले.
कार्यक्रमास राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकांत देशपांडे, सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत-शिंदे, फलटण प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप, तहसिलदार समीर यादव, राज्य निवडणूक कार्यालच्या प्रमुख अधिकारी पल्लवी जाधव यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
‘