नागरिकांना कमी वेळात व कमी खर्चात न्याय मिळणे गरजेचे – उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप शिंदे

 

सातारा दि. 14 (फलटण टुडे ): नागरिकांना जवळच्या जवळ, लवकर आणि कमी खर्चात न्याय मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सातारा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी केले. वाई येथे श्री. शिंदे यांच्या हस्ते जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या नूतन न्यायालयांच्या उद्घाटनाचा सोहळा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

 

            यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सातारा जिल्हा पालक न्यायमूर्ती राजेश पाटील, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे, वाईचे नूतन जिल्हा न्यायाधीश एस.के. नंदीमठ, वाईच्या नूतन अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रिती तारू, वाई बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय खडसरे, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, वाईचे तहसिलदार रणजित भोसले आदींसह जिल्ह्यातील तालुका न्यायाधीश, जिल्हा व तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष, सदस्य, वकील उपस्थित होते.

 

            वाई येथील नवीन जिल्हा न्यायालयामुळे तीन तालुक्यातील पक्षकारांची सोय झाली असल्याचे सांगून श्री. शिंदे म्हणाले, न्याय आपल्या दारी हे मुंबई उच्च न्यायालयाचे तत्व आहे. त्या तत्वा नुसारच आता वाई येथे जिल्हा न्यायालय सुरू होत आहे. न्यायाचा हक्क सर्वांना आहे. त्याचबरोबर न्यायाचा हक्क सर्वांना मिळवून देणे ही तितकेच महत्वाचे आहे. न्यायाचा हक्क मिळवून देण्याचे हे तत्व वाई येथे आज सत्यात उतरले आहे. वाई शहराला पौराणिक, एतिहासिक पार्श्वभूमी लाभली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

            न्यायालय हे एक मंदिर असल्याचे सांगून श्री. पाटील यावेळी म्हणाले, पक्षकार चप्पल काढून, नमस्कार करून न्यायालयाच्या कक्षात प्रवेश करतात. त्यामागे आपल्याला येथे न्याय मिळेल हा त्याला विश्वास असतो. त्याचा हा विश्वास वाई येथील या नवीन न्यायालयामुळे सार्थ होईल. न्यायालय जवळ आल्यामुळे लवकर न्याय मिळेल व खटल्यांचे प्रलंबित्व कमी होण्यास मदत होईल.

 

            न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर खटले प्रलंबित असणे हे चिंताजनक असल्याचे सांगून श्रीमती धोटे यावेळी म्हणाल्या की, वाई न्यायालयाकडे आता या विभागातील खटले वर्ग करण्यात आले आहेत. या न्यायालयाचे कार्यक्षेत्र हे वाई, खंडाळा, महाबळेश्वर या तीन तालुक्यांचे असणार आहे. सर्वांनी मिळून खटल्यांच्या निपटाऱ्यासाठी प्रयत्न करू. सर्वांच्या समन्वयानेच हे शक्य होते. राष्ट्र सबळीकरणासाठी सर्वांनीच हातभार लावूया. त्यासाठी सेवाभाव जोपासूया. प्रलंबित खटले कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. त्यासाठी नियोजनही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

            सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते फित कापून व कोनशिलेचे आनावरण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ॲड्. श्री. कणसे यांनी आपल्या मनोगतामध्ये वाई न्यायालयाच्या स्थापनेसाठी केलेल्या प्रयत्नांचा तसेच वाई न्यायालयाचा इतिहास याची माहिती दिली. यावेळी वाई शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!