रस्ता सुरक्षा अभियान प्रसंगी बोलताना सातारा उपप्रादेशिक परिवहन सबइन्स्पेक्टर धनंजय कुलकर्णी , इन्स्पेक्टर योगेश सुरवसे , प्राचार्य बाबासाहेब गंगवणे व उपप्राचार्य एम के फडतरे
फलटण, दि. १३ (फलटण टुडे ) : –
नियमांचे पालन न करणे, निष्काळजीपणे वाहन चालविण्यामुळे बहुतांश अपघात होतात. अपघाताच्या घटनांमध्ये काहीजण व्यक्तिगत कारणांमुळे इतरांना इजा पोहोचवतात. अपघात कमी करण्यासाठी राबविण्यात येणारे रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
11 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे. त्या अंतर्गत चांगले आणि दर्जेदार वाहन चालक तयार करण्याच्या उद्देशाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा व फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रस्ता सुरक्षा शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन उपप्रादेशिक परिवहनचे अधिकारी धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी योगेश सूर्यवंशी, प्राचार्य बाबासाहेब गंगवणे, उपप्राचार्य एम. के. फडतरे, पर्यवेक्षक शिवाजीराव काळे आदी उपस्थित होते.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी धनंजय कुलकर्णी म्हणाले कि, वाहन चालक जोपर्यंत वाहन चालवताना गैरवर्तणुक करणे थांबवत नाहीत तोपर्यंत अपघात होतील. कायदा, नियम पाळणे हा सर्वात महत्वाचा आहे. याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. भारतात अनेक लोक नियमांचे पालन करत नाहीत. पण हेच लोक जेंव्हा विदेशात जातात तिथे ते मुकाटपणे नियम पाळतात. दुर्घटना टाळणे फार सोपी गोष्ट आहे. ओव्हर स्पीडिंग, डिस्ट्रक्शन टू ड्रायव्हर, रेड लाईट जम्पिंग असे साधे साधे नियम आहेत, जे पाळणे आवश्यक असते. 45% लोक गाडी चालवत असताना बोलल्यामुळे झालेले आहेत. सर्वात जास्त रस्ते अपघातात मृत्युमुखी प्रमाण 18 ते 35 वयोगटातील युवकांचे आहे ही फार चिंतेची बाब आहे.
तसेच आता चालताना हे अपघात टाळण्यासाठी नेहमी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे जेणेकरून समोरून येणारे वाहन कोणत्या दिशेने येते याचा आपल्याला अंदाज घेऊन आपण आपली सुरक्षितता करू शकतो याच्यासाठी हे अभियान आता राबवण्यात येत आहे असे यावेळी कुलकर्णी यांनी सांगितले.
यावेळी प्राचार्य बाबासाहेब गंगवणे यांनी सांगितले की युवा वर्गात अपघात होऊन मृत्युमुखी पडण्याचे कारण पालकांनी मुलांचा पुरवलेला बालहट्ट हे आहे. लहान वयात गाडी हातात देऊन तो पुरवला जातो. आपण वेगावर नियंत्रण ठेऊन 50 ते 60 च्या वेगाने किंवा त्यापेक्षा कमी वेगाने गाडी चालवून ते रोखण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एम. एस. पवार यांनी केले तर प्रास्ताविक एम. के. फडतरे यांनी तर आभार अमोल रणवरे यांनी मानले.