सातारा दि. 12 (फलटण टुडे ): –
महाबळेश्वर व तापोळा परिसरातील पयर्टन विकासाच्या अनुषंगाने करावयाच्या विविध विकास कामांचा राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सविस्तर आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या आढावा बैठकीस खासदार डॉ. शिंदे, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे दूरदृष्य प्रणालीद्वारे तर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महाबळेश्वर येथील साबणे रोड सुशोभिकरणबाबत तेथील व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, साबणे रोड सुशोभीकरणासाठी दोन्ही बाजुंच्या गटारांवरील अतिक्रमण काढून ती जागा सुशोभीकरणासाठी अंतिम करावी. महाबळेश्वर-तापोळा रस्ता सुधारणेची निविदा अंतिम करुन कामाला सुरुवात करावी तसेच या कामाचा दर्जा चांगला ठेवावा. तापोळा ते अहिर या पुलाचे काम लवकरात लवकर करावे.
श्री. देसाई पुढे म्हणाले, तापोळा परिसर पर्यटन क्षमता वाढीबाबत 4.17 कोटींचा पर्यटन विकास आराखडा प्रादेशिक पर्यटन कार्यालयास सादर करण्यात आला आहे. यामधून तापोळा परिसरातील विकास कामे करण्यात येणार आहे. याचा प्रशासनाने पाठपुरावा करावा. दरे येथील उत्तेश्वर देवस्थान तिर्थक्षेत्रास ब वर्गाचा दर्जा मिळणेबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. त्याचा पाठपुरावा केला जाईल. त्याचबरोबर उतेश्वर तिर्थक्षेत्र विकास कामांना निधी मंजूर झाला आहे. त्यातून तेथील विकास कामे हाती घेण्यात यावीत. दरे गावची गावठाणाची हद्द निश्चित करण्यासाठी नव्याने सर्व्हे करुन भविष्यातील वाढती लोकसंख्या विचारात घेवून गावठाण विस्तारवाढ करावी.
तापोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयात करावयाचे आहे, असे सांगून श्री. देसाई म्हणाले, हे ग्रामीण रुग्णालय उभारणीसाठी महसूल विभागाने शासकीय जागा उपलब्ध करुन द्यावी. शासकीय जागा उपलब्ध होत नसल्यास खासगी जागा खरेदी करण्याबरोबर ग्रामीण रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा.
वेण्णालेक पर्यायी रस्त्याच्या अडचणी दूर करुन पर्यायी रस्त्याचे काम तातडीने सुरु करावे. पाचगणी- महाबळेश्वर वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पर्यटकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याबाबत पोलीस विभागाने अंमलबजावणी करावी. तसेच पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यालगत अतिक्रमण केलेल्यांना नोटीसा देवून अतिक्रमण काढावे यासाठी मनुष्यबळही उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
खासदार डॉ. शिंदे म्हणाले, महाबळेश्वर येथील साबणे रोड सुशोभीकरणाचा आराखडा चांगल्या पद्धतीने तयार करावा. महाबळेश्वर ते तापोळा रस्त्याचे काम लवकर सुरु होईल यासाठी प्रयत्न करावेत. वन विभागाच्या जागेबाबत काही अडचणी असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. तापोळा येथे नव्याने ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी. दरे गाठवण विस्तारवाढीसाठी कार्यवाही करावी. दरे येथील नागरिकांची घरे मातीची आहेत त्यांना आवास योजनेचा लाभ देवून पक्के घरे बांधून द्यावीत. तापोळा व दरे गावठाणचा विषय जिल्हा प्रशासनाने मार्गी लावावा, अशा सूचनाही डॉ. शिंदे यांनी यावेळी केल्या.
या बैठकीमध्ये महाबळेश्वर साबणे रोड सुशोभीकरण, महाबळेश्वर-तापोळा रोड सुधारणा, अहिर तापोळा रस्ता सुधारणा, तापोळा परिसर पर्यटन क्षमता वाढ, पाचगणी-महाबळेश्वर रस्ता सुधारणा व अतिक्रमण काढणे, वेण्णालेक पर्यायी रस्ता, दरे उत्तेश्वर देवस्थान तिर्थक्षेत्र दर्जा देणे, दरे गावठाण विस्तार वाढ करणे, तापोळा येथील प्राथमिक आरोग्य केद्र सुधारणा व पाचगणी महाबळेश्वर वाहतूक कोंडी सुरळीत करणे या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करुन पालकमंत्री श्री. देसाई व खासदार डॉ. शिंदे यांनी संबंधित विभागांनी कामे लवकरात लवकर सुरु करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या.