सातारा दि. 8 ( फलटण टुडे ) : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ चे कलम १४ (ब) अन्वये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढविणा-या प्रत्येक उमेदवाराने (बिनविरोधसह) निवडणूकीचा निकाल प्रसिध्द झाल्यापासुन ३० दिवसाच्या आत एकत्रित खर्चाचा हिशोब विहीत नमुन्यात प्रतिज्ञापत्रासह निवडणूक निर्णय अधिकारी/तहसिलदार यांचेकडे सादर करणे बंधनकारक आहे. निवडणूक लढविणाऱ्या ज्या उमेदवारांनी अद्याप पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर केलेला नाही त्यांना निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करण्याचा अंतिम दिनांक १९ जानेवारी, २०२३ आहे, असे उपजिल्हाधिकारी महसूल प्रशांत आवटे यांनी कळविले आहे.
तरी, सर्व उमेदवारांनी दि. १९ जानेवारी २०२३ पूर्वी निवडणूक खर्चाचा हिशोब संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी / तहसिलदार यांचेकडे सादर करावा अन्यथा विहीत मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर न करणारे उमेदवार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ च्या कलम १४ (ब) (१) अन्वये कारवाईस पात्र राहतील. निवडणूक खर्चाचा हिशोब विहीत कालावधीत सादर न केल्यास, जिल्हाधिकारी ती व्यक्ती निरर्ह असल्याचे घोषित करतील आणि अशी व्यक्ति, अशा आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षाच्या कालावधीकरिता सदस्य म्हणून राहण्यास किंवा निवडणूक लढविण्यास निरर्ह असेल, असेही श्री. आवटे यांनी कळविले आहे.