प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न
सातारा दि. 6 (फलटण टुडे ): मांढरदेवी ता. वाई येथील श्री काळुबाई देवीच्या यात्रेला प्रारंभ झाला असून आज पहाटे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्या हस्ते भक्तिभावाने शासकीय पूजा करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. नंदीमठ, तहसिलदार रणजित भोसले, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कदम दापंत्यांना पूजेचा मान
विंग ता. खंडाळा येथील राहुल कदम व रोशनी कदम यांना शासकीय पूजेचा मान मिळाला. पूजेचा मान मिळाल्याबद्दल मांढरदेवी ट्रस्टचे त्यांनी आभार मानले.
प्रशासनाचे चांगले नियोजन
मांढरदेव येथील काळुबाई देवीच्या यात्रेच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच ठिकठिकाणी तपासणी पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर आरोग्य पथकेही तैनात ठेवण्यात आली आहेत. भाविकांना कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याबाबत भाविकांनी समाधान व्यक्त केले.