फलटण, दि. ४ (फलटण टुडे ): –
‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित ३० व्या ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण व कुडाळ (जि.सिंधुदुर्ग) येथील ज्येष्ठ राष्ट्रीय कलावंत पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते होणार आहे. विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूरचे उपसंचालक डॉ.संभाजीराव खराट यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली सदरचा पुरस्कार वितरण समारंभ पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’ सभागृहात शुक्रवार, दि.६ जानेवारी २०२३ रोजी राज्यस्तरीय पत्रकार दिनी स.१०:३० वा. आयोजित केल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना विजय मांडके यांनी सांगितले की, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने पोंभुर्ले – जांभे – देऊळवाडी ग्रामस्थ आणि जांभेकर कुटूंबिय यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय पत्रकार दिनानिमित्त दरवर्षी संस्थेच्या पोंभुर्ले (जि.सिंधुदुर्ग) येथील ‘दर्पण’ सभागृहात बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन व राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण केले जाते. यंदा या पुरस्कारांचे ३० वे वर्ष असून या समारंभात सन २०२२ च्या प्रतिष्ठेच्या ‘दर्पण पुरस्कारां’चे वितरण होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत राज्यस्तरीय ‘धाडसी पत्रकार’ पुरस्कार – सौ.शीतल करदेकर (मुंबई), राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार कोकण विभाग – शैलेश पालकर (पोलादपूर) व सुरेश कौलगेकर (वेंगुर्ला), उत्तर महाराष्ट्र विभाग – जयप्रकाश पवार (नाशिक), विदर्भ विभाग – डॉ.राजेंद्र मुंढे (वर्धा), पश्चिम महाराष्ट्र विभाग – अनुराधा कदम (कोल्हापूर), मराठवाडा विभाग – प्रल्हाद उमाटे (नांदेड), विशेष ‘दर्पण’ पुरस्कार – सदाशिव मोहिते (फलटण) व किरण बोळे (फलटण) यांचा समावेश आहे.
‘दर्पण’कारांच्या जन्मभूमीत ‘दर्पण’ स्मारक सभागृहात आयोजित केलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमास ‘दर्पण’कारांना अभिवादन करण्यासाठी राज्यातील पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर, माध्यमप्रेमी नागरिक व पोंभुर्ले पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव व कृष्णा शेवडीकर यांनी केले आहे.