२००७-०८ च्या बीएड बॅचचा स्नेहमेळावा भावनिक वातावरणात संपन्न

१४ वर्षाच्या भेटीची ओढ पूर्णत्वास गेली. २००७ साली भीमा शैक्षणिक न्यास संचलित सुभाषअण्णा कुल शिक्षणशास्त्र महाविद्यालय पाटस या ठिकाणी आम्हाला प्रवेश मिळाला. अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्वांनी बीएड पूर्ण केले. बीएडचे अध्ययन करून जो तो आपापल्या गावी परतला, परंतु मैत्रीच्या नात्याने एकमेकांच्या मनात जे घर केले होते ते कायम होते. 
      महिन्यांमागून महिने वर्षामागून वर्ष पालटत गेली. गाठीभेटी दुरावल्या.  जो तो नौकरी, उद्योग, व्यवसायात रमून गेला. सुखदुःखाचे बोलणे नाही, की काही नाही. जो तो संसारात यथेच्छ डूबलेला. मैत्री दुरावत गेली. पण मैत्रीच्या नात्याची सर कुणाला येणं शक्य नाही. वर्षभर कुठल्या ना कुठल्या कामात रमणारा शेतकरी सुगी संपल्यावर मात्र झाडाच्या थंडगार सावलीत विसावला जातो. तशा अनेक वर्षानंतर मित्र-मैत्रिणींच्या आठवणी सतावू लागल्या. आभाळ भरून यावे तसे आठवणींचे उमाळे दाटून येऊ लागले. पावसाचे पाणी जमिनीवर पडून ती जरा फुगून वर येते व वेगळाच सुगंध दरवळू लागतो तसे मित्र मैत्रिणींच्या भावनिक शब्दांनी मैत्रीचा धागा ओलाचिंब होऊ लागला. पाच-सहा, किंवा नऊ-दहा नव्हेतर तब्बल १४ वर्षानंतर स्नेह मेळाव्याचा २५ डिसेंबर २०२२ हा दिवस ठरला. कोण कसा दिसत असेल? किती बदल झाला असेल? अशा अनेक प्रश्नांचे मनामध्ये काहुर दाटलेले.
      आज प्रत्यक्ष कार्यक्रमाला येताना तर आनंदाला उधाण आलेलं. कधी एकदाचे मित्र-मैत्रिणींना भेटतोय आणि आपल्या हृदयात, साठवून असलेली १४ वर्षापासूनची खदखद बोलून दाखवतोय. सर्वजण अकरा वाजेपर्यंत एकत्र जमले आणि दीप प्रज्वलन करून प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात झाली. हरेकजण आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून देत होता. मित्रांची हृदयद्रावक कहानी ऐकून इतरांचे कंठ दाटून येत होते. भावनांचे बांध फुटत होते. १४ वर्षाचा प्रवास तो १४ मिनिटांत बोलून सांगता येईल? पण वेळ सर्वांना तिची आठवण करून देत होती. भावनेला आवर घालावी लागत होती. सर्वांच्या बोलण्यातून एकच सुर निघत होता की, ज्या ठिकाणी आपण काम करतोय ते प्रामाणिकतेच्या आणि समाधानाच्या पातळीवर मोजणे गरजेचे आहे. शेती, नोकरी, उद्योग काहीही करा, पण मैत्री, आपलेपण जपा. एकमेकांच्या सुखदुःखाचे भागीदार व्हा.
    मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी सर्व गुरूवर्यांनीही आवर्जून हजेरी लावली. कुणी कोणत्याही क्षेत्रात गेला आणि कितीही मोटिवेशनल स्पीकर भेटले तरी मित्रासारखा मोटिवेशनल जगाच्या पाठीवर कुणी असुच शकत नाही आज खात्रीने सांगता येत होते. अशा जीवाभावाच्या मित्र-मैत्रिणींची गाठभेट ही आपणा सर्वांसाठी एक नवसंजीवनीच आहे. जीवनात उमेद हारलेल्यांना मित्रच सावरू शकतो हे आज सर्वांना उमगले होते. शरीराने आपण कितीही दूर असा, परंतु मनाने मात्र एकमेकांच्या जवळ असणं महत्त्वाचं आहे. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन एकमेकास कठीण काळी केलेली मदत किंवा सांत्वनपर बोललेले दोन शब्द त्याच्यासाठी लाख मोलाचे असतात हे विसरता कामा नये. एकमेकांशी संवाद किती महत्त्वाचा आहे हेही गुरुजनांच्या बोलण्यातून आले. संवाद हरवलेला माणूस असून नसल्यासारखा वाटतो. पद, पैसा, श्रीमंती यात खरे समाधान नसून आपल्या मैत्रीच्या नात्यातील माणसं आपल्याशी जोडलेले असण्यात खरे समाधान आहे. अशी सर्वांनी एकमेकांना भावनिक साद घातली. उत्कृष्ट असे नियोजन करून ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला ते, आनंदराव वाबळे दादा, पुजा भोंडवे, दिनेश गडधे, संतोष शितोळे, सचिन दिवेकर या शिक्षक मित्रांचे सर्वांनी आभार मानले आणि एकमेकांची गळाभेट घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!