फलटण, दि. 24 : श्रीरामदासस्वामी संस्थान, सज्जनगड यांच्यावतीने श्रीसमर्थ विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतून श्री क्षेत्र सज्जनगडावरून निघालेला श्री समर्थ पादुकांचा प्रचार दौरा फलटण शहरात दाखल झाला असून यावेळी श्री समर्थ पादुकांचे स्वागत प.पु.गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर ट्रस्टच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
कर्म, उपासना, ज्ञान आणि मोक्ष या चतु:सुत्रीवर आधारित कर्मनिष्ट जीवनप्रणाली या श्रीसमर्थ विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या मुख्य हेतूने श्री क्षेत्र सज्जनगडावरून श्रीरामदासस्वामी संस्थानतर्फे भिक्षा दौरा आयोजित केला जातो. या दौर्याचे काल, दि. 24 रोजी फलटण शहरात आगमन झाले असून गुरुवार, दि. 29 अखेर दौरा प.पु.गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर (लक्ष्मीनगर) येथे मुक्कामी असणार आहे. यावेळी श्री समर्थ घराण्याचे अकरावे वंशज व दौरा प्रमुख भूषण महारुद्र स्वामी, प. पु. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्थेचे खजिनदार अनिरुद्ध रानडे, विश्वस्त शंतनू रुद्रभटे, फलटण तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सागर सस्ते यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
श्री सज्जनगड येथे जी पाणी पुरवठा योजनेचे काम झालेले आहे; ते तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते ना. अजित पवार व विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बहुमूल्य साथीने झालेले आहे. आगामी 100 वर्षे पाण्याची कमतरता काही श्री सज्जनगडावर भासणार नाही, याची विशेष काळजी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे श्री सज्जनगड व फलटण यांचे जुनेच असलेले ऋणानुबंध आणखीच दृढ झालेले आहेत, असेही यावेळी श्री समर्थ घराण्याचे अकरावे वंशज व दौरा प्रमुख भूषण महारुद्र स्वामी यांनी स्पष्ट केले.
या ठिकाणी दौरा कालावधीत दररोज सकाळी 6 ते 11 व दुपारी 4 ते रात्री 9:30 पर्यंत भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. या दौर्यादरम्यान श्रीसमर्थ पादुकांसमोर काकड आरती, सूर्यनमस्कार, श्रीसमर्थ पादूका पूजन, भजन, कीर्तन, प्रवचन, सज्जनगडावरील सांप्रदायिक उपासना व शेजारती असे कार्यक्रम होणार आहेत. दररोज सकाळी 8 ते 12 या वेळात शहराच्या विविध भागात भिक्षेचा कार्यक्रम व श्रीसमर्थ पादुकांचे सामुदायिक व वैयक्तिक पादुका पूजन होणार आहे.
पादुका दौर्यादरम्यान सकाळी 6 वाजता काकड आरती, स.7:30 वा. पादुकांना अभिषेक व आरती, स.8 ते दु.12 सांप्रदायिक भिक्षा फेरी, दु.3 ते 4:30 स्थानिक भजन सेवा, सायं.6 ते 7 सांप्रदायिक उपासना, सायं.7 वा. आरती, सायं.7:30 ते रात्री 9:30 स.भ.राघवेंद्रबुवा रामदासी (देशपांडे) यांचे कीर्तन, रात्री 9:30 वा. शेजारती हे दैनंदिन कार्यक्रम पार पडणार आहेत.
सकाळी 8 ते 12 या वेळेत निघणारच्या भिक्षा फेरीचा मार्ग रविवार, दि. 25 रोजी कोळकी येथील मालोजीनागर- अक्षतनगर – अजितनगर – सावतामाळी नगर – नरसोबानगर, दि.26 रोजी प.पु.गोविंद महाराज उपळेकर समाध मंदिर – गजानन चौक – तेली गल्ली – दगडी पुल – शुक्रवार पेठ – भैरोबा गल्ली – ब्राह्मण गल्ली – कुंभार गल्ली – शिंपी गल्ली – खाटिक गल्ली – बुरुड गल्ली, दि. 27 रोजी डेक्कन चौक – जलमंदिर – बारव बाग – डी.एड.चौक – लक्ष्मीनगर आणि दि. 28 रोजी विद्यानगर – हडको कॉलनी – संभाजीराजे नगर – बिरदेव नगर – संजीवराजे नगर – भडकमकर नगर असा राहणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प. पु. गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर संस्थेचे खजिनदार अनिरुद्ध रानडे यांनी मानले.
गुरुवार, दि.28 रोजी सायंकाळी 7 वाजता प.पु.गोविंद महाराज उपळेकर समाधी मंदिर येथे महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पादुका दौर्याचा समारोप समारंभ पार पडणार असून दि.29 रोजी सकाळी पादुका दौर्याचे पुण्याकडे प्रयाण होणार आहे.