४८ वी कुमार-मुली (ज्युनिअर) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खोखो स्पर्धा, रायगड कुमारांमध्ये ठाणे वि. उस्मानाबाद व पुणे वि.अहमदनगर तर मुलींमध्ये उस्मानाबाद वि. ठाणे व सांगली वि.नाशिक उपांत्य फेरीत लढणार

रोहा, रायगड, ( फलटण टुडे वृत्तसेवा.) : 
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित ४८ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेतील उपउपांत्य फेरीचे सामने चूरशीचे झाले. कुमारांमध्ये ठाणे वि. उस्मानाबाद व पुणे वि.अहमदनगर तर मुलींमध्ये उस्मानाबाद वि. ठाणे व सांगली वि.नाशिक उपांत्य फेरीत लढणार आहेत.  

धाटाव (ता. रोहा) येथील कै. नथुराम (भाऊ) पाटील क्रीडानगरीत, परमपुज्य पांडुरंगशास्त्री आठवले विद्यालय आणि एम. बी. मोरे फाऊंडेशन महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर सुरु आहेत. कुमार गटाच्या उपउपांत्य फेरीतील सामन्यात अहमदनगरने मुंबईचा १४-१३ असा १ गुण १ मिनिट राखून पराभव केला. अहमदनगरच्या सुयश क्षीरसागर (२.२०, १ मि. संरक्षण व ३ गुण ), शिवम बामदळे (१.१०, १.१० मि. संरक्षण, व ४ गुण ), किशोर खवळे (१.५०, १.३० मि. संरक्षण ) यांनी चांगला खेळ केला तर मुंबईच्या विशाल खाके (१.३०, १.५० मि. संरक्षण व ३ गुण ), हर्ष कामतेकर (१.२०, १ मि. संरक्षण व २ गुण ) यांनी जोरदार लढत दिली.

दुसऱ्या सामन्यात पुण्याने सांगलीचा १५-१४ असा ३ मि. राखून १ गुणाने पराभव केला. पुण्यातर्फे विवेक ब्राम्हणे (१, २ मि. संरक्षण व २ गुण ), अमरेश गायकवाड (१.४०, १.५० मि. व २ गुण ) तर सांगलीच्या यूजर मोमीन (१ मि. संरक्षण व ४ गुण), ओमकार पाटील (५ गुण) यांनी चांगला खेळ केला.

तिसऱ्या सामन्यात ठाण्याने मुंबई उपनगरचा १५-१४ असा ६ मि. राखून १ गुणाने पराभव केला. विजयी संघातर्फे वैभव मोरे (१.१०, २ मि. संरक्षण व ४ गुण ), रुपेश खंडाळकर (२ मि. संरक्षण व २ गुण ), साहिल खोपडे (१, २.४० मि. संरक्षण व १ गुण ) असा खेळ केला. उपनगरच्या सुजल जामगाडे (१.५० मि. संरक्षण व ३ गुण ), निखिल सोडये (२.१० मि. संरक्षण व ३ गुण ) असा खेळ केला.

चौथ्या सामन्यात उस्मानाबादने सोलापूरवर १७-१५ अशी चुरशीच्या सामन्यात २ गुणांनी बाजी मारली. उस्मानाबादच्या श्रीशभो पेठे (१.१०, २.२० मि. संरक्षण व ५ गुण ), भरतसिंग वसावे (१.३०, १.४० मि. संरक्षण व २ गुण ) यांच्या खेळाच्या जोरावर सामना खिशात घातला.

मुली गटात ठाणे विरुद्ध सोलापूर हा सामना जादा डावापर्यंत रंगला. ठाण्याने सोलापूरवर १७-१६ असा एक गुणाने सामना जिंकताना निसटता विजय नोंदवला. या सामन्यात दोन्ही संघांचा कस लागल्याचे पाहायला मिळाले. सामना बरोबरीत झाल्यावर नऊ मिनिटाच्या जादा डावात सोलापूरने ठाण्याचे ५ गडी बाद केले. तर ठाण्याने ६ गडी बाद करत सामन्यावर विजयी मोहोर उमटवली. ठाण्याच्या कल्याणी कंक (नाबाद ३.२०, २ मि. संरक्षण व २ गुण ), काजल शेख (१.५०, २ मि. संरक्षण ), दिव्या गायकवाड (१, १.१०, १.२० मि. संरक्षण व १ गुण ) यांनी चांगला खेळ करत विजयात मोलाची कामगिरी केली. सोलापूरच्या प्रीती काळे (२ मि. संरक्षण व ५ गुण ) संध्या सुरवसे (२, २, १.३० मि. संरक्षण व २ गुण) यांची कामगिरी उठावदार झाली.     

दुसऱ्या सामन्यात सांगलीने पुण्याला परभवाचा धक्का दिला. हा सामना सांगलीने १२-१० असा २ गुण व २ मिनिटे राखून जिंकला. सांगली तर्फे सानिका चाफे (३.३०, ३ मि. संरक्षण ), नेहा वाठारकार (२.४०, १.४० मि. संरक्षण व २ गुण), रिया चाफे (१.३० मि. संरक्षण व ३ गुण ) यांनी दिलेल्या जोरदार लढतीमुळे पुण्याला पराभव पत्करावा लागला. पुण्याच्या प्रांजली शेडगे (२, २ मि. संरक्षण), दीपाली राठोड (४ गुण) यांनी पराभवात सुध्दा चांगल्या कामगिरीची नोंद केली.  

उस्मानाबादने अहमदनगरचा १७-५ असा १ डाव १२ गुणांनी तर नाशिकने रत्नागिरीचा ११-६ असा एक डाव ५ गुणांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
—————————————
लाल मातीतील खो-खो खेळाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. रोहा येथे होत असलेल्या या राज्य स्पर्धेतील दोन्ही सर्वोत्कृष्ट खेळाडूंना इलेक्ट्रिकल दुचाकी देऊन गौरव करू असे उद्योजक पुनित बालन यांनी उदघाटन प्रसंगी जाहीर केले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघानी माघारी जाताना ही स्पर्धा आठवणीत ठेवतील अशा उत्कृष्ट सोईसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करत आहोत असे पुनीत बालन यांनी सांगितले. श्री. बालन हे अल्टीमेट खो-खो स्पर्धेतील मुंबई खिलाडी या संघांचे मालक आहेत.
—————————————
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!