मतदार नोंदणी मार्गदर्शन शिबिरास मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, प्राचार्य डॉ. अनिरुद्ध महात्मे व इतर
फलटण ।। फलटण टुडे ।। : –
दिनांक ८ डिसेंबर रोजी फलटण एज्युकेशन सोसायटीचे, अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण, येथे मतदार जनजागृती मोहिमे अंतर्गत आयोजित, मतदार नावनोंदणी प्रशिक्षण शिबिरामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे अठरा वर्षे वय पूर्ण झाले आहे परंतु मतदार यादी मध्ये नाव नाही अशा विद्यार्थ्यांना मतदार यादी मध्ये नाव नोंदणी करता यावी या उद्देशाने प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना ज्या विद्यार्थ्यांचे मतदार यादी मध्ये नाव समाविष्ट नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी वोटर हेल्पलाइन या ॲपच्या माध्यमातून नाव नोंदणी करावी असे आवाहन केले. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून याचे पालन जर सर्वांनी केले तर योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग होतो व योग्य लोकप्रतिनिधी निवडून दिले जाऊ शकतात. लोकशाही मजबूत करण्यासाठी, प्रत्येक नागरिकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, व आपले मतदार यादी मध्ये नाव असणे अत्यंत आवश्यक असून ज्या विद्यार्थ्यांनी अठरा वर्षे वय पूर्ण केले आहे व अजूनही ज्यांचे मतदार यादी मध्ये नाव नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी आजच मतदार नाव नोंदणी करावी असे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या मार्गदर्शन शिबिरासाठी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिरुद्ध महात्मे उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना वोटर हेल्पलाइन हे ॲप्लिकेशन त्यांच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून विद्यार्थ्यांची नाव नोंदणी या ॲपद्वारे करण्यात आली. एकूण ६५ विद्यार्थ्यांनी ॲपद्वारे मतदार यादीसाठी नाव नोंदणी केली अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिरुद्ध महात्मे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी प्रा. शांताराम काळेल यांनी केले व आभार प्रदर्शन मेकॅनिकल विभाग प्रमुख प्राध्यापक दत्तात्रय सांगळे यांनी केले.