रत्नागिरी ः अपेक्षा सुतार सारखे खेळाडू क्रिडा क्षेत्रात पुढे येत असतील तर त्यांना आमचे सरकार नक्की पाठींबा देईल. क्रीडा विभागाच्या कोट्यातून सरकारी नोकरीत सामावुन घेऊ. तिच्यासारखे खेळाडू निर्माण होणे ही रत्नागिरीसह महाराष्ट्राच्या दृष्टीने काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
उस्मानाबाद येथे झालेल्या ५५ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महिला गटातून महाराष्ट्र संघात रत्नागिरीचे प्रतिनिधीत्व करत देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार पटकावणार्या अपेक्षा सुतार या गुणवान खो-खो पटूचा उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तिच्या कुवारबाव येथील घरी जाऊन सत्कार केला.
सोमवारी (ता. २८) सायंकाळी कुवारबाव येथील सुतार यांच्या घरी हा कार्यक्रम झाला. पुरस्कार प्राप्त अपेक्षाला मंत्री सामंत यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. याप्रसंगी अपेक्षाचे वडील अनिल सुतार, तिची आई, भाऊ आणि सुतार कुटूंबीय, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष बाळू साळवी, संतोष कदम, फैय्याज खतिब, उल्का पुरोहित, कुवारबावमधील प्रतिष्ठीत नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सुतार कुटूंबियांतर्फे पुष्पगुच्छ देऊन मंत्री सामंत यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मंत्री सामंत यांनी स्वतःहून अपेक्षाचा केलेला हा गौरव तिच्या उज्जल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे असे सुतार कुटूंबियांतर्फे उल्का पुरोहीत यांनी सांगितले. मंत्री सामंत यांच्या पाठींब्यामुळे आज रत्नागिरीत सर्व मैदानी खेळांमध्ये विविध खेळाडू यश मिळवत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मंत्री सामंत म्हणाले, अपेक्षा सुतार हीचे अभिनंदन करत असतानाच तिच्या प्रशिक्षकांचेही अभिनंदन करत आहे. महाराष्ट्राचे क्रिडाक्षेत्रातील प्रतिनिधीत्व करण्याची संधी अपेक्षाला मिळाली ही रत्नागिरीकरांचे भाग्य आहे. अशी मुले क्रिडा क्षेत्रात पुढे येत असतील, तर आमचे सरकार त्यांना पाठींबा देईल. भविष्यात क्रीडाविभागचा कोट्यामधून नोकरीत सामावून घेण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करु. अपेक्षा सारखे खेळाडू निर्माण होत असतील तर रत्नागिरीसह महाराष्ट्राच्या क्रीडासंस्कृतीच्या वाढीसाठी काळाची गरज आहे.