फलटण, दि.25 : आज इतिहासाला वर्तमानाचे नायक करुन समाजात, राजकारणात वैरभाव निर्माण केला जात आहे. ऐतिहासिक कादंबर्यांना मनोरंजनाच्या मार्गावर नेण्याचा दुर्दैवी प्रकार घडतो आहे. यातून इतिहासाचा अपव्यय करणारा आजचा महाराष्ट्र आपल्याला दिसत असून राजकारण्यांकडून याला खतपाणी घातले जात आहे. वारकरी सांप्रदाय आणि भागवत् धर्माचा पाया असलेला, सामाजिक समतेला प्राधान्य देणारा यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा आजचा महाराष्ट्र नक्कीच नाही, अशी खंत यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी व्यक्त केली.
येथील नामदेवराव सूर्यवंशी-बेडके महाविद्यालयात थोर नेते स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई पुरस्कृत श्रीराम एज्युकेशन सोसायटी व श्री सद्गुरु प्रतिष्ठान, फलटण यांच्या सहकार्याने महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा फलटण आयोजित दहाव्या ‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलना’च्या अध्यक्षस्थानावरुन किशोर बेडकिहाळ बोलत होते. व्यासपीठावर संत साहित्याचे अभ्यासक उल्हासदादा पवार, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ, प्रदीप पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे विश्वस्त विनोद कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे पुणे विभागीय उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर, हरणाई सूत गिरणीचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, संमेलन स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले, कार्याध्यक्ष डॉ.सचिन सूर्यवंशी – बेडके, म.सा.प.फलटण शाखा अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळ सदस्य महेंद्र सूर्यवंशी – बेडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
किशोर बेडकिहाळ पुढे म्हणाले, सशक्त लोकशाही ग्रामीण भागात रुजवण्याचे काम यशवंतराव चव्हाणांनी केले. त्यांनी नव्या ग्रामीण नेतृत्त्वाला सत्तेचा स्पर्श दिला. लोकशाहीच्या बळकटीसाठी राज्यकारभाराबरोबर सत्ता नेतृत्त्व याचेही विकेंद्रीकरण करावे लागेल, हे सूत्र त्यांनी हेरले. त्यांच्या कारकीर्दीत सहकार, कृषी, उद्योग, समाजरचना, शिक्षण, साहित्य, संस्कृती यासह सर्वच क्षेत्रांत दीर्घ परिणाम करणारी धोरणे स्वीकारली गेली. यशवंतराव चव्हाण साहित्याचे रसिक वाचक व आस्वादी समीक्षकही होते. त्यांना साहित्याची व साहित्यिकांची उत्तम जाण होती. सुसंस्कृत यशवंतरावांच्या हाती महाराष्ट्राचे नेतृत्त्व जाणे हे महाराष्ट्राचे भाग्यच म्हणायला हवे. यशवंतराव चव्हाणांसारखा सबंध महाराष्ट्र मानेल असा एकही नेता आज नाही, असेही बेडकिहाळ यांनी यावेळी नमूद केले.
उल्हासदादा पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी वैश्विक मानवतेचा विचार मांडला. राज्यात भागवत् धर्माच्या विचारांचे बीज रुजावे, उदारमतवादाची आणि मानवतेची संस्कृती टिकावी आणि महाराष्ट्र एकसंघ रहावा अशी त्यांची नेहमीच भूमिका होती. दुर्दैवाने त्यांच्या विचारांची प्रगल्भता आजच्या राजकारणात दिसत नाही. यशवंतराव चव्हाणांचे राजकारण राजकीय अभिनिवेषापलिकडचे होते; त्याचा अभाव आजच्या राजकारणात दिसत असून हे देशाच्या अखंडत्वाला धोकादायक आहे. आजचे राजकारण कटुतेकडे जात असून यातून लोकशाहीचे मांगल्य कमी होत आहे. हे लोकशाहीचे मांगल्य संपू देवू नये हीच यशवंतरावांना योग्य श्रद्धांजली ठरेल, असेही पवार यांनी आवर्जून सांगितले.
महाराष्ट्राने ‘यशवंत विचारां’चे बोट सोडल्याने आजची सामाजिक व राजकीय परिस्थिती विदारक बनत चालली आहे. विचारस्वातंत्र्य, लेखनस्वातंत्र्य यावर गदा येत असून युवकांना ‘धर्म’ महत्त्वाचा की ‘भाकरी’ हे पटवून देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे, रविंद्र बेडकिहाळ यांनी सांगितले.
प्रारंभी संमेलनाचे उद्घाटन उल्हासदादा पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाणांच्या प्रतिमेस अभिवादन करुन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी डॉ.राजू पाटोदकर, विनोद कुलकर्णी यांनीही संमेलनाच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. दिलीपसिंह भोसले व डॉ.सचिन सूर्यवंशी – बेडके यांनी संमेलनाची पाश्वभूमी विशद करुन उपस्थितांचे स्वागत केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेच्यावतीने देण्यात येणारा महाराजा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि; फलटण पुरस्कृत ‘यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्कार’ येळीव (ता.खटाव) येथील हरणाई सहकारी सूत गिरणीचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांना किशोर बेडकिहाळ व उल्हासदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सहकाराचा पाया घालणार्या यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनी आपली वाटचाल सुरु असल्याने सहकारात ध्येयप्राप्ती करणे शक्य झाल्याचे पुरस्काराला उत्तर देताना देशमुख यांनी स्पष्ट केले.
मान्यवरांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील महाविद्यालीयीन वार्षिक नियतालिक स्पर्धा व राज्यस्तरीय उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद, श्रीराम एज्युकेशन सोसायटी, श्री सद्गुरु व महाराजा संस्था समूहाचे पदाधिकारी, सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.