फलटण ( फलटण टुडे ) :
महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेच्यावतीने व महाराजा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि; फलटण यांच्या सौजन्याने देण्यात येणारा यंदाचा ‘यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्कार येळीव (ता.खटाव) येथील हरणाई सहकारी सुतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांना जाहीर झाला असल्याचे, श्री सद्गुरू व महाराजा संस्था समूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले यांनी सांगितले.
येथील म.सा.प. शाखा, श्रीराम एज्युकेशन सोसायटी व श्री सद्गुरु प्रतिष्ठान यांच्यावतीने प्रतिवर्षी आयोजित होणार्या ‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनात’ सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तीला महाराजा मल्टिस्टेटच्या सौजन्याने ‘यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्कारा’चे वितरण केले जाते. यंदा या पुरस्कारासाठी सातारा जिल्ह्यातील माण – खटावसारख्या दुष्काळी तालुक्यामध्ये हरणाई सहकारी सूतगिरणी व प्रबोधनकार ठाकरे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी, पिंगळी शुगर ग्रीड लि; या संस्थांच्या माध्यमातून सहकार रुजवून हजारो लोकांच्या हाताला काम देणारे रणजितसिंह देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. दि.25 नोव्हेंबर रोजी फलटण येथे आयोजित ‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलना’त देशमुख यांना या पुरस्काराचे वितरण माजी आमदार तथा संत साहित्याचे अभ्यासक उल्हासदादा पवार व संमेलनाध्यक्ष तथा ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांच्या हस्ते होणार असल्याचे दिलीपसिंह भोसले यांनी सांगितले आहे.