——–
रेल्वे, विदर्भसह कोल्हापूरची बाजी
पुरुष गतविजेते रेल्वे व महिला गतउपविजेते भारतीय विमान प्राधिकरण यांच्यासह कोल्हापूर आणि विदर्भाच्या पुरुष व महिला संघानेही उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
——–
असे होणार उपउपांत्यपूर्व लढती : पुरुष : रेल्वे-पुदूचरी, तेलांगणा-आंध्र, केरळ-दिल्ली, छत्तीसगड-कर्नाटक, कोल्हापूर-मध्य भारत, विदर्भ-पश्चिम बंगाल, तमिळनाडू-ओडिसा गुजरात-महाराष्ट्र.
महिला: महाराष्ट्र-आंध्र, तामिळनाडू-केरळ, कोल्हापूर-दिल्ली, उत्तर प्रदेश-हरियाणा, कर्नाटक-राजस्थान, ओडीसा-पश्चिम बंगाल, गुजरात-पंजाब, विदर्भ-भारतीय विमान प्राधिकरण.
—————
महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघाचा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश महाराष्ट्र पुरुषांमध्ये गुजरात विरुध्द तर महिलांमध्ये आंध्र प्रदेश विरुध्द लढणार
उस्मानाबाद २२ नोव्हें. (फलटण टुडे) :
महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघानी ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला खो खो स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखताना महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी बाद फेरीत धडक मारताना पुरुषांनी मध्य भारताला तर महिलांनी उत्तर प्रदेशवर डावांनी विजय मिळवण्याचा धडाका कायम ठेवला आहे. उपउपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्र पुरुषांमध्ये गुजरात विरुध्द तर महिलांमध्ये आंध्र प्रदेश विरुध्द लढणार आहे.
भारतीय खोखो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खोखो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धा तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात २४ नोव्हेंबर पर्यंत चालू राहणार आहेत.
आज सकाळच्या सत्रात महिला गटाच्या सामन्यात महाराष्ट्राने आपल्या खेळाची चमक दाखवत उत्तर प्रदेशचा २१-९ असा डावाने दणदणीत पराभव केला. नाणेफेक जिंकून आक्रमण करताना प्रियंका इंगळेने ८ गुण मिळवले. अपेक्षा सुतार आणि दिपाली राठोड यांनी प्रत्येकी ३ गुण मिळवताना प्रियंकाला चांगली साथ दिली. पुजा व संपदा मोरे यांनी प्रत्येकी २ गुण मिळवले. तर रेश्मा राठोड, स्नेहल जाधव, प्रिती काळे यांनी प्रत्येकी १ गुण मिळवत डावच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. महाराष्ट्राने संरक्षण करताना अपेक्षा सुतारने २:३० मि. आणि अश्विनी शिंदेने ३:०५ मि. संरक्षण करुन निवृत्ती स्विकारली. संपदा मोरे हिने १:१५ मि. संरक्षण तर स्नेहल जाधवने १:४० मि. नाबाद संरक्षण केले. मध्यांतराला मिळवलेल्या २१-४ अश्या आघाडीनंतर महाराष्ट्राने उत्तर प्रदेशवर फॉलोऑन देत पुन्हा संरक्षण केले. फॉलोऑन नंतर महाराष्ट्राच्या प्रिती काळेने २:३० मि. संरक्षण आणि दिपाली राठोड हिने २:०५ मि. संरक्षण करुन निवृत्ती स्विकारली. गौरी शिंदे हिने १:२५ मि. संरक्षण तर रुपाली बडे हिने १:५० मि. संरक्षण केले व एका मोठ्या विजयाला गवसणी घातली. उत्तर प्रदेशच्या काजलची कामगिरी चांगली झाली.
पुरुष गटात महाराष्ट्राने मध्यभारतवर २१-९ अशी डावाने बाजी मारली. मध्यभारतने नाणेफेक जिंकून संरक्षण स्विकारले. प्रथम आक्रमणाच्या या डावामध्ये महाराष्ट्राच्या ऋषिकेश मुर्चावडे ४ गुण, लक्ष्मण गवस, निहार दुबळे, सुरज लांडे यांनी प्रत्येकी ३ गुण मिळवले. अनिकेत पोटे, गजानन शेंगाळ यांनी प्रत्येकी २ गुण मिळवण्यात यश मिळवल. तर अक्षय भांगरे, रामजी कशब, प्रतीक वाईकर यांनी प्रत्येकी १ गुण मिळवला. महाराष्ट्राने संरक्षण करताना प्रतीक वाईकर ३ मि. संरक्षण, लक्ष्मण गवस २:४० मि. संरक्षण, ऋषिकेश मुर्चावडे १:३० मि. आणि रामजी कश्यप १:१०मी संरक्षण करुन निवृत्ती स्विकारली. मध्यंतराच्या २१-०५ अश्या स्थितीनंतर महाराष्ट्राने मध्यभारतवर फॉलोऑन देत पुन्हा संरक्षण केले. त्यावेळी महाराष्ट्राच्या दिलीप खांडवी २:३० मि. संरक्षण, आदित्य गणपुले २:१० मि. संरक्षण, गजानन शेंगाळ १:५० मि. संरक्षण, अनिकेत पोटे १:१० मि. संरक्षण आणि अक्षय भांगरे याने १:२० मि. नाबाद संरक्षण केले. मध्य भारतच्या अभिषेकने चांगली कामगिरी केली.