सातारा :
भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनर्रीक्षण कार्यक्रमानुसार सर्व ग्रामपंचायतींमध्ये दि. 10 नोव्हेंबर 2022 रोजी विशेष ग्राम सभा आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्या अनुषंगाने ग्रामपंचायत क्षेत्रातील अस्तित्वात असलेली मतदार यादी ग्रामसभेमध्ये गावातील सर्व नागरिकांना पहाण्यासाठी, तपासण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मतदार यादीमधील नोंदीबाबत नागरिकांना हरकती असल्यास त्यांना नोंदीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास किंवा नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी दिलेल्या हरकती, आक्षेप, दुरुस्त्या वा नाव नोंदणीच्या अर्जाच्या स्थितीबाबत त्या नागरिकांना कोठून व कशी माहिती मिळेल याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तरी 10 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विशेष ग्राम सभांमध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होवून मतदार नाव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी व उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत यांनी केले आहे.