मुंबई, पुणे, ठाणे, उस्मानाबाद, सोलापूर, मुंबई उपनगर, सांगली, रत्नागिरी यांची विजयी सुरवात
हिंगोली, ५ नोव्हें. ( फलटण टुडे):
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने हिंगोली जिल्हा खो-खो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली तालुका खो-खो असोसिएशन आयोजित ५८ वी पुरुष व महिला राज्य अंजिक्यपद व निवडचाचणी खो-खो स्पर्धा ५ ते ८ नोव्हेंबर या कलावधीत रामलिला मैदान, हिंगोली येथील प्रागंणात सकाळ व दुपारच्या सत्रात होणार आहेत. सांकळी या स्पर्धा विद्युत झोतात होतील. या स्पर्धेत साखळी सामन्यांमध्ये पुरुष गटातील सातारा विरुध्द धुळे सामना बरोबरीत सुटला. तर मुंबई, पुणे, ठाणे, उस्मानाबाद, सोलापूर, मुंबई उपनगर, सांगली, रत्नागिरी संघांनी पहिल्या दिवशीच्या सामन्यांमध्ये विजय मिळवला.
महिला गटात पुण्याने परभणीचा एक डाव १५ गुणांनी पराभव केला. प्रियांका इंगळे (३.२० मि. संरक्षण ), स्नेहल जाधव (३.१० मि. संरक्षण), काजल भोरने (२.५० मि. संरक्षण व ५ गुण) यांनी चांगला खेळ करत संघाला विजय मिळवून दिला. परभणीतर्फे भाग्यश्री राठोडने चांगला खेळ केला.
महिला गटातील जळगावबरोबरचा सामना रत्नागिरीने १ डाव १६ गुणांनी (१८-२) जिंकला. अपेक्षा सुतार (४ गुण), साक्षी डाफळे (३ गुण), दिव्या पालये (२ गुण), ऐश्वर्या सावंत (२ गुण) यांच्या धारदार आक्रमणाच्या जोरावर रत्नागिरीने जळगावचे १८ खेळाडू बाद केले. संरक्षणात आर्या डोर्लेकर (२.३० मि. संरक्षण), साक्षी लिंगायत (३.२० मि. संरक्षण) तर ऐश्वर्या सावंत (नाबाद २.५० मि. संरक्षण) केले.
महिला गटाच्या अन्य सामन्यांमध्ये मुंबई उपनगरने सिंधुदुर्गचा १ डाव १३ गुणांनी (१८-५), ठाणेने नंदुरबारचा १ डाव २० गुणांनी (२४-४) विजय मिळवला.
पुरुष गटातील सातारा विरुध्द धुळे सामना (१४-१४) बरोबरीत सुटला. गटातील सामना असल्यामुळे दोघांना समान गुण देण्यात आले आहेत. सातारातर्फे प्रतिक जगदाळे (२.१०, १.२० मि. संरक्षण व १ गुण), ॠषिकेश जाधव (२, १.३० मि. संरक्षण व १ गुण) यांनी तर धुळेतर्फे परेश भोई (२.१० मि. संरक्षण व १ गुण), विकास बैसाणेने (१.१०, २ मि. संरक्षण व २ गुण) यांनी चांगला खेळ केला.
तसेच उस्मानाबाद संघाने नांदेडचा १ डाव ८ गुणांनी पराभव केला. निखिल म्हस्के (३ मि. संरक्षण), सचिन पवार (१, २.२० मि. संरक्षण व २ गुण), किरण वसावेने (५ गुण) यांनी विजयात मोलाची कामगिरी केली. पराभूत संघातर्फे आकाश चंचलवाडने (२ गुण) चांगला खेळ केला.
मुंबईने रायगडचा १२-९ असा १ डाव ३ गुणांनी पराभव केला. मुंबईच्या वेदान्त देयाई (२ मि. संरक्षण व २ गुण), करण गारोळे व नीरव पाटील (प्रत्येकी २:२० मि. संरक्षण) व श्रीकांत वल्लाकाठी (२ मि. संरक्षण) यांच्या जोरावर मोठा विजय मिळवला. तर पराभूत रायगडच्या राज देशमुख, यश जाधव व अनिल पाटील यांनी चांगला खेळ केला.
अन्य सामन्यांमध्ये सोलापूरने हिंगोलीचा १ डाव ४ गुणांनी (१४-१०), ठाणेने परभणीचा (१८-१३) १ डाव ५ गुणांनी, सांगलीने धुळेचा २ गुण व ८ मिनिटे राखून तर रत्नागिरीने जालनावर १ डाव १४ गुणांनी विजय मिळवला.