खो – खो स्पर्धेची फलटणमध्ये सर्वोत्कृष्ट व्यवस्था; अनेक राज्यातील प्रशिक्षकांचे मत

फलटण, दि. ०३ ( फलटण टुडे) :
 सध्या फलटण येथे राष्ट्रीय किशोर व किशोरी खो – खो स्पर्धेचे भारतीय खो-खो महासंघ, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, सातारा जिल्हा ॲमॅच्युअर खो – खो असोसिएशन व फलटण एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये फलटण या ठिकाणी खेळाडू, कप्तान, संघचालक यांच्यासोबत संघामध्ये आलेल्या सर्वांची सर्वोत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे असे मत विविध राज्यातील प्रशिक्षक व संघचालकांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण येथील माजी आमदार स्व. श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर क्रीडांगणावर ३२ व्या राष्ट्रीय किशोर किशोरी खो – खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण येथे काटेकोरपणे राष्ट्रीय खो खो सामन्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अतिशय बारीक गोष्टींवर सुद्धा लक्ष देत खेळाडू, कप्तान व संघचालक यांच्यासोबत आलेल्या सहकाऱ्यांना कोणतीही उणीव भासू नये याची विशेष दक्षता घेतलेली आहे.

खेळाडू, कप्तान यांच्यासह संघाचे प्रशिक्षक, संघचालक व त्यांच्यासोबत आलेल्या सहकाऱ्यांना अगदी सकाळी उठल्यानंतर आवरण्यासाठी गरम पाणी असो किंवा त्यांना जो नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे; त्या व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये व कोणाचेही हाल होऊ नयेत, याची विशेष दक्षता घेण्याबाबतचे निर्देश महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिलेले आहेत.

याबाबत काही कप्तानांशी बातचीत केली असता त्यांनी सर्वच व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केलेले आहे.

फलटण येथे 32 वी राष्ट्रीय किशोर व किशोरी खो-खो स्पर्धेचे आयोजन जे केलेले आहे. तर ही स्पर्धा आमच्यासाठी अविस्मरणीय अशी ठरणार आहे. येथे करण्यात आलेल्या सर्व व्यवस्था या अतिशय सुंदर असून आम्ही राजस्थान वरून १२ किशोरी व १२ किशोर खेळाडू घेऊन स्पर्धा खेळण्यासाठी आलेलो आहोत. आमच्या सोबत मॅनेजर व संघचालक सुद्धा आहेत. आम्हाला या व्यवस्थेमध्ये कोणतीही कमी जाणवलेली नाही, असे मत राजस्थान संघाचे प्रशिक्षक बाबूलाल यादव यांनी व्यक्त केले.

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे 32 वी राष्ट्रीय किशोर किशोरी खो – खो स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन फलटण नगरीमध्ये करण्यात आलेले आहे. त्यामध्ये जेवण व्यवस्था, मैदान व्यवस्था व मेडिकल टीम त्यासोबतच मैदानावरील स्वयंसेवक हे सर्वजण मिळून एकदम उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत, कुठलीही उणीव फलटणकर आम्हाला भासू देत नाहीत, असे मत महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक प्रफुल्ल हाटवडे यांनी व्यक्त केले.

मी सुधामु रॉय मंडलू वेस्ट बंगाल वरून किशोरी संघाची कप्तान म्हणून आलेली आहे. मी राष्ट्रीय खो-खो संघाची कप्तान म्हणून पहिल्यांदाच आपली भूमिका बजावत आहे. सातारा जिल्ह्याच्या फलटणमध्ये ज्या राष्ट्रीय खो-खोच्या स्पर्धा होत आहेत त्यातील नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे. खो – खो खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी त्यामध्ये भोजनाची व्यवस्था, त्यासोबतच मैदानाची व्यवस्था व राहण्याची व्यवस्था ही अतिशय उत्कृष्ट आहे. आम्ही मुलींना घेऊन इथे राहात आहे. यामध्ये सुद्धा कोणतीही कमी आयोजकांच्या कडून जाणवण्यात आलेली नाही. अगदी बारकाईनेच बोलायचे झाले तर स्वच्छ वॉशरूम, अंघोळीसाठी गरम पाणी हे सुद्धा आम्हाला फलटणला मिळालेले आहे. या सर्व व्यवस्थेबाबत आम्ही सर्वजण आनंदी आहे असेही मत या वेळेला पश्चिम बंगालच्या प्रशिक्षक सुधामूरॉय मंडलू यांनी व्यक्त केले.

आम्ही फलटण येथे हैद्राबादवरून आलेलो आहोत. आम्ही लोणंद रेल्वे स्थानकावर उतरून तेथून फलटणला आलेलो आहोत. लोणंद रेल्वे स्थानकावर आम्हाला आणण्यासाठी आयोजकांनी गाडीची व्यवस्था केलेली होती. आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला चांगल्या दर्जाचे नाश्ता व भोजन मिळत आहे. त्यासोबतच आमची राहण्याची व्यवस्था सुद्धा आयोजकांच्या माध्यमातून उत्तम करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी जे मैदान तयार करण्यात आलेले आहे, ते मैदान सुद्धा उत्तम आहे. त्यासोबतच मैदानापासून राहण्याच्या ठिकाणापर्यंत आयोजकांच्या वतीने गाडीची सोय करण्यात आली आहे. फलटणला झालेले सामने आम्ही कधीही विसरू शकणार नाही, असे मत तेलंगणा राज्याचे प्रशिक्षक ए. रवीकुमार यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय खो-खो सामन्याचे मैदान हे अतिशय उत्कृष्ट असून राहण्याची व्यवस्था सुद्धा सर्वोत्तम करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आम्हाला दर्जेदार अन्न खायला मिळत आहे. प्रेक्षकांसाठी भव्य दिव्य गॅलरी सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे, असे मत तमिळनाडू संघाच्या प्रशिक्षक जे. के. मनी मुथू राजा यांनी व्यक्त केले.

सातारा जिल्ह्याच्या फलटण या ठिकाणी 32 व्या किशोर किशोरी खो – खो स्पर्धेचे आयोजन खूपच चांगल्या नियोजनामध्ये संपूर्ण होत आहे. या ठिकाणी मुलांची राहण्याची सोय तसेच जेवणाची सोय मस्तच करण्यात आलेली आहे. या स्पर्धा आम्ही खूपच आनंदी वातावरणामध्ये पार करत आहोत. एक विशेष गोष्ट म्हणजे मुलांना राहण्याच्या ठिकाणावरून घेऊन जाण्यासाठी व येण्यासाठी त्यासोबतच त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्वांनाच प्रवास करण्यासाठी येथील सर्वच पदाधिकारी व कर्मचारी काळजी घेत आहेत. फलटण येथे संपन्न झालेल्या खो-खो स्पर्धांची एक चांगली आठवण आमच्या मनामध्ये कायमस्वरूपी घर करून राहणार आहे असे मत कोल्हापूर संघाचे प्रशिक्षक अवधूत वडेकर यांनी व्यक्त केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!