फलटण, दि २ ( फलटण टुडे.) :
भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने सातारा जिल्हा अॅमॅच्युअर खो-खो असोसिएशनच्या अधिपत्याखाली ३२ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा येथील घडसोली मैदानावरील आमदार श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक-निंबाळकर क्रीडा संकुलात सुरू झाली असून आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. किशोर-किशोरी गटाच्या ३२व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुले व मुलींनी अंतिम फेरी गाठली असून दोन्ही सामने कर्नाटक विरुध्द होणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीपर्यंत डावाने विजय मिळविण्याची घोडदौड सुरूच ठेवली आहे.
आज सकाळी महाराष्ट्राच्या मुलांनी कोल्हापूरचा १२-७ असा एक डाव ५ गुणांनी धुव्वा उडविला. पहिल्या डावात राज जाधव (२:५०, १:२० मि. संरक्षण) व हाराद्या वसावे (नाबाद १:५० मि. संरक्षण व ३ गुण) तर दुसऱ्या डावात सोत्या वळवी (२:२० मि. संरक्षण व २गुण) व संग्राम डोंबाळे (१:४० मि. संरक्षण व २ गुण) यांनी शानदार खेळी केली. कोल्हापूरकडून वरद (१:४० मि. संरक्षण), प्रेमनाथ (१:१० मि. संरक्षण), समर्थ (२ गुण) यांची लढत अपुरी ठरली.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतउपविजेत्या कर्नाटकला उत्तर प्रदेशवर १७-१५ अशी १:२० मिनिटे राखून मात करताना कडवी लढत द्यावी लागली. उत्तर प्रदेशच्या करन (२:२०,१:१० मि. संरक्षण व ४ गुण) व अब्दूलच्या (१:२०,१:०० मि. संरक्षण) शानदार खेळीमुळे मध्यंतरापर्यंत ८-८ अशी बरोबरी होती. त्यानंतर मात्र, कर्नाटकच्या इब्राहिम (१:३०, १:२० मि. संरक्षण व ६ गुण) व तेजसने (२:०० मि. संरक्षण व २ गुण) बहारदार खेळी करीत विजय खेचून आणला.
महाराष्ट्राच्या मुलींनी राजस्थानवर ९-६ असा एक डाव ३ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. महाराष्ट्राच्या विजयात धनश्री कंक (४, ३:१० मि. संरक्षण) व विद्या तामखडे (१:५०, २ मि. संरक्षण) यांनी भक्कम संरक्षणाची बाजू सांभाळली. प्राजक्ता बनसोडे हिने आक्रमात ३ गुण मिळवत विजयात मोठी कामगिरी बजावली.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात कर्नाटकने दिल्लीला २१-८ असे नमविले. त्यांच्या सुस्मिताने १:१० मि. संरक्षण करीत तब्बल ८ गुण मिळवले. या स्पर्धेत एका सामन्यात सर्वाधिक गुण मिळवण्याचा मान तिने मिळवला. गायत्री (३:२० व ६:२० मि. संरक्षण) संरक्षण केले. दिल्लीच्या ललिताने १:२०,१:५० व २ मि. संरक्षण करीत एकाकी लढत दिली.
——