तेलंगणाच्या खेळाडूचा प्रामाणिकपणा; आठ हजार रुपयांचे पाकीट केले परत

तेलंगणाच्या डी तनुश्री हिचा सत्कार करताना महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर 
फलटण, दि. ०१ ( फलटण टुडे ): 
सध्या सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रीय किशोर व किशोरी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये संपूर्ण देशभरातून विविध राज्यांचे संघ सामील झालेले आहेत. त्यामध्येच स्पर्धा होत असलेल्या ठिकाणी तेलंगणा किशोरी संघामधील डी तनुश्री या किशोरी खेळाडूला आठ हजार रुपयांचे भरलेले पाकीट सापडले; परंतु ते पाकीट तिने प्रामाणिकपणे मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बाबासाहेब गंगावणे यांच्याकडे सुपूर्त केले. ते पाकीट होते कोल्हापूर संघाच्या प्रशिक्षकाचे आयोजकांनी याबाबत खात्री करून खेळाडू कडून आलेले पाकीट संघाच्या प्रशिक्षकाच्या हातात सन्मानपूर्वक दिले.

सध्याच्या काळामध्ये सर्वजण पैशाच्या मागे लागलेली असतात. सर्वांनाच पैसे हवे असतात; परंतु अशा मध्येच किशोर व किशोरी मुलांमधील प्रामाणिकपणा समोर येऊ लागलेला आहे. फलटण येथे होत असलेल्या राष्ट्रीय खो – खो सामन्यांमध्ये तेलंगणाच्या डी तनुश्री हिला पैशाने भरलेले पाकीट सापडले. जर तिने ठरवले असते तर ती कुठेही बोभाटा न करता ते पाकीट स्वतःबरोबर घेऊन गेली असती. पैशाची रक्कम सुद्धा थोडी थोडकी नव्हती तर ती होती रुपये आठ हजार. साधारणपणे सर्वसाधारण कुटुंबातील दोन महिन्याची ही कमाई असू शकते. परंतु आपल्यावर असलेले संस्कार आपल्या आई-वडिलांनी व आपल्या गुरूंनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे तिने प्रामाणिकपणा दाखवत पैशाने भरलेले पाकीट आयोजकांकडे सुपूर्द केले. त्यानंतर आयोजकांनी हे पाकीट कोणाचे आहे याबाबत मागोवा घेत ज्याचे पाकीट आहे. त्याची खात्री करूनच त्यांच्याकडे सुपूर्द केले.

सध्या फलटणमध्ये राष्ट्रीय खो-खोचे सामने सुरू आहेत. या सामन्यांमध्ये संपूर्ण देशातून विविध संघ सामील झालेले आहेत. यामध्येच तेलंगणाच्या डी तनुश्री सारखे अजून अनेकही खेळाडू सहभागी झालेले आहेत. आत्ताच्या काळामध्ये पैशाचा हव्यास हा सगळ्यांनाच असतो, परंतु पैशापेक्षा सुद्धा प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. हे आज घडलेल्या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण येथील माजी आमदार स्व. श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुलामध्ये 32 वी राष्ट्रीय किशोर व किशोरी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी आजचा सर्व प्रकार घडला व खेळाडूचा प्रामाणिकपणा सुद्धा समोर आला.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!