३२ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धा यजमान महाराष्ट्राचे बाद फेरीतील प्रवेश निश्चित

केरळ, हरियाणा व आंध्रप्रदेशचे निसटते विजय

तेलंगना (भगवा) विरुद्ध केरळ या मुलांच्या सामन्यातील सुर मारून गडी बाद करण्याचा टिपलेला क्षण. 

फलटण दि. ३१ ( फलटण टुडे) :
 भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने सातारा जिल्हा अॅमॅच्युअर खो-खो असोसिएशनच्या अधिपत्याखाली ३२ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा येथील घडसोली मैदानावरील आमदार श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक-निंबाळकर क्रीडा संकुलात सुरू झाली असून ही स्पर्धा दोन नोव्हेंबरपर्यंत चालेल. यजमान महाराष्ट्राचे प्रत्येकी एक साखळी सामने बाकी असले तरी त्यांनी बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. साखळी पद्धतीने सुरू असलेल्या या स्पर्धेत आपापल्या गटातून विजयी व उपविजयी होण्यासाठी प्रत्येक संघ प्रयत्नशील आहे. केरळ, हरियाणा व आंध्रप्रदेशच्या मुलांनी प्रतिस्पर्धी संघावर निसटते विजय मिळविले.

मुलांच्या गटात केरळने तेलंगणाचा १३-१२ तर आंध्रने गुजरातचा १२-११ असा पराभव केला. हरियाणाने पाँडिचेरीवर १३-१२ अशी केवळ १० सेकंद राखून मात केली.

मुलींच्या गटात गतवर्षी तृतीय स्थानावर असलेल्या दिल्लीने पाँडिचेरीला १२-९ असे नमविले. पश्चिम बंगालने झारखंडला १४-१० असे पराभूत केले. तेलंगणाने हिमाचल प्रदेशला ११-९ असे १.३० मिनिटे राखून हरविले. छत्तीसगडने मध्य प्रदेश वर १३-६ असा विजय मिळविला.

अन्य निकाल (सर्व संघाचे विजय  डावाने) : मुले : झारखंड  वि.वि. ओरिसा ९-८, राजस्थान वि.वि. हिमाचल प्रदेश २०-६, उत्तर प्रदेश वि.वि. बिहार १४-६, मध्य प्रदेश वि.वि. जम्मू काश्मीर १८-५, मध्य भारत वि.वि. दादरा नगर हवेली १९-०, छत्तीसगड वि.वि. मध्य प्रदेश १७-५.

मुली : कर्नाटक वि.वि. मध्य भारत १९-५, तामिळनाडू वि.वि. बिहार २०-०, केरळ वि.वि. उत्तराखंड १२-२, आंध्र प्रदेश वि.वि. जम्मू काश्मीर १६-०.
(सर्व छायाचित्रे : भूषण कदम)
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!