फलटण:गेल्या शंभर वर्षांत आशिया खंडातील नामवंत अग्रमानांकित शिक्षण संस्था म्हणून रयत शिक्षण संस्थेने लौकिक प्राप्त केला आहे. स्वावलंबी शिक्षण हेच ब्रीद मानून रयतेमध्ये सर्व सामान्य बहुजन विद्यार्थी शिक्षण घेत आहे. कमवा व शिका या उपक्रमाबरोवर कर्मवीर विद्याप्रबोधिनी, गुरुकुल व विविध स्पर्धा परीक्षा अशा अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीबरोबरच स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा, समता, बंधुता, सहिष्णुता या मूल्यांची जोपासना करणारी रयत शिक्षण संस्था ही आजच्या काळातील आदर्श संस्कारपीठ आहे असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालय फलटण येथील मराठी विभागातील प्राध्यापक डाॅ. अशोक शिंदे यांनी केले. कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय बिजवडी आयोजित पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंती कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे नवनियुक्त जनरल बाॅडी सदस्य श्री. हनुमंत जगन्नाथ भोसले होते.
याप्रसंगी विठ्ठलराव भोसले, दौलतराव जाधव, अप्पा अडागळे, योगेश भोसले, प्रतिक भोसले व मुख्याध्यापक बी.के. सावंत व हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते
या कार्यक्रमात बोलताना प्राध्यापक शिंदे पुढे म्हणाले की कर्मवीरांनी अत्यंत परिश्रम व विचारपूर्वक रयतेची स्थापना केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षि शाहू या महापुरूषांच्या विचार व कार्यांची प्रेरणा घेऊन रयतेची स्थापना झालेली दिसते. शिक्षणाच्या माध्यमातून सर्व सामान्य बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या मूलभूत संकल्पनेचा अंगीकार केलेला दिसतो. प्रथम विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, नंतर प्रशिक्षित शिक्षक निर्माण व्हावेत म्हणून ट्रेनिंग काॅलेज व नंतर शाळा – काॅलेजची निर्मिती असे शिक्षणप्रक्रियेचे सूत्रबद्ध व सुनियोजित प्रारूप त्यांनी विकसीत केले. या माध्यमातून बहुजन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत अडचणी दूर होऊन तो शिक्षणाच्या मूळ प्रवाहात सामील झालेला आहे. आजपर्यंत लक्षावधी विद्यार्थ्यांचे आयुष्य रयतेमुळे समृद्ध झालेले आहे.
आज रयत शिक्षण संस्थेच्या विविध शैक्षणिक गुणवत्ता वर्धक उपक्रमाबरोबरच साहित्य, कला, क्रीडा या क्षेत्रातील नैपूण्यप्राप्तीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. देशातील शिक्षणप्रक्रियेची आदर्श प्रयोगशाळा म्हणून रयतेकडे पाहिले जाते. शैक्षणिक विचाराबरोबरच येथे सामाजिक, नैतिक व राष्ट्रीय मूल्यांची जोपासना करण्याचे जाणिवपूर्वक प्रयत्न केले जातात. म्हणूनच रयत शिक्षण संस्था हे केवळ शैक्षणिक ज्ञानपीठ नसून सामाजिक बांधिलकीचे विचारपीठ व नैतिक तथा राष्ट्रीय मूल्यांची जोपासना करणारे संस्कारपीठ आहे. विद्यार्थ्यांनी या विविध उपक्रमामध्ये सहभागी होऊन आपले व्यक्तिमत्व घडवावे व कर्मवीर आण्णांचे विचार सार्थक करावेत असे आवाहनही डाॅ. शिंदे यांनी यावेळी केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना हनुमंत भोसले यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राबवत असलेल्या उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी दोलत जाधव व प्रतिक भोसले या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचा प्रारंभ स्वागतगीताने झाला. मुख्याध्यापक सावंत यांनी प्रास्ताविक, श्री. बिडवे यांनी अहवाल वाचन तर श्री. पवार यांनी प्रमुख अतिथिंचा परिचय करून दिला. या कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंत व विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अभय गावडे यांनी
केले व श्री. निंबाळकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.
या कार्यक्रमास ग्रामस्थ, विविध समिती सदस्य तसेच सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.