पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचवली – गणेश तांबे

महाराष्ट्रातील शैक्षणिक क्रांतीचे जनक म्हणून संबोधले जाणारे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणारे एक दिग्गज व्यक्तिमत्व ज्यांनी एक छोटेसे लावलेले रोपटे आज संपूर्ण राज्यभर त्याचा वटवृक्ष झाला असून त्या वटवृक्षाच्या फांद्या संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या आपणास दिसून येतात. ते महान कार्य थोर समाजसुधारक शिक्षण क्रांतीचे जनक म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील होय. 
महात्मा फुले यांनी समाजात जागृती घडवून आणण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले.महात्मा फुलें यांच्या विचारापासून प्रेरणा घेऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये शिक्षण प्रसार सुरू केला. बहुजन समाजात लोकजागृती घडवून आणली.तसेच कर्मवीर भाऊराव पाटील हे शाहू महाराजांच्या सहवासात वाढले असल्याने त्यामुळे त्यांच्या कार्याचा प्रभाव कर्मवीरांच्या मनावर मोठा परिणाम करणारा ठरला. कर्मवीर भाऊराव पाटील हे सत्यशोधक चळवळीच्या विचारांचे कार्यकर्ते बनले, पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजाला शिक्षण दिल्याशिवाय तो शहाणा होणार नाही. याची जाणीव कर्मवीरांना झाली आणि त्या जाणिवेतूनच त्यांनी “रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून महाराष्ट्रात फार मोठा शैक्षणिक चळवळ उभी केली.
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील “ऐतवडे बुद्रुक”हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे गाव त्यांचे संपूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील. त्यांचा जन्म कुंभोज या गावी 22 सप्टेंबर 1887 रोजी झाला. त्यांचा बालपणीचा काळ कुंभोज इथे गेला. वडिलांची सतत होणारी बदली.यामुळे त्यांनाही त्यांच्याबरोबर फिरावे लागले. प्राथमिक शिक्षण “कुंभोज”
या ठिकाणी झाले. शिक्षणापेक्षा ते सतत मित्रांच्या बरोबर खेळत असत डोंगर-दर्‍यांमधे फिरत असत, नदीमध्ये पोहोत असत. त्यांचा शिक्षणपेक्षा इतर गोष्टींमध्ये  वेळ जास्त जात असे.
कर्मवीर भाऊराव अत्यंत तल्लख बुद्धीचे आणि हुशार होते.उत्तम चारित्र्य,आज्ञाधारकपणा आणि शारीरिक कष्टाची तयारी या गुणांमुळे भाऊराव त्यांच्या शिक्षकांना नेहमी आवडत असत.
त्यावेळचा काळ जातिव्यवस्थेने भरभटलेला होता.त्यामुळे कोणावर अन्याय झाला की कर्मवीर भाऊराव हे पेटून उठत असत.आपल्या अस्पृश्य मित्राला विहिरीवर पाणी पिण्यास दिले नाही म्हणून त्यांनी विहिरीचा रहाटच मोडून विहिरीत टाकला. अन्यायाची चिड असलेल्या कर्मवीरांना, समतेवर आधारलेला नवा समाज निर्माण करण्याची प्रेरणा राजर्षी शाहू महाराजांच्या कडूनच मिळाली.त्या काळात अस्पृश्य जातीतील लोकांना स्पृश्य जातीतील लोक स्पर्श करीत नसत.आणि चुकून स्पर्श झालाच तर त्यांना आंघोळ करावी लागे. कर्मवीरांना लहानपणापासूनच जाती व्यवस्थेबद्दल चीड होती. समाजातील जाती व्यवस्था आर्थिक आणि सामाजिक विषमता भाऊराव पाटील यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
कर्मवीर अाण्णा यांचा शेठ माणिकचंद यांच्याशी चांगला परिचय झाला, कर्मवीरांचा धाडसी स्वभाव प्रामाणिकपणा, तसेच कष्ट करण्याची तयारी हे गुण त्यांना भावले त्यामुळेच कर्मवीरांना आपल्या घरी नेऊन ठेवले व त्यांना जवाहिराचा धंदा शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु कर्मवीरांना यात रस वाटला नव्हता. त्यांचे असे मत होते की, “कृत्रिम हिऱ्यांना पैलू पाडण्यापेक्षा लक्षवेधी माणसांच्या स्वरूपात जिवंत असणाऱ्या हिऱ्यांना त्यांनी आयुष्यभर पैलू पाडण्याचे काम जीवनकार्य म्हणून स्वीकारले होते” हे त्यांनी केलेल्या कार्यावरून आपल्याला दिसून येते.
पूर्वी बालविवाह पद्धत असल्यामुळे 1912 मध्ये कर्मवीरांचा विवाह कुंभोज पाटील घराण्यातील “आद्दाक्का” यांच्याशी झाला. सासरी मात्र “लक्ष्मी” या नावाने त्यांना ओळखले जाऊ लागले. एके दिवशी पाहुण्यांच्या समोर आपल्या वडिलांनी आमचे चिरंजीव काही करत नाहीत फक्त दोन वेळा जेवतात आणि दिवसभर भटकत असतात हे उद्गार ऐकून जेवण वाढत असलेल्या लक्ष्मीबाईचे डोळे अश्रूंनी भरून आले. आपल्या बायकोसमोर वडिलांनी काढलेले हे उद्गार कर्मवीर भाऊराव यांच्या जिव्हारी लागले.त्यामुळे कर्मवीरांचा स्वाभिमान दुखावला आणि त्यांनी त्याच दिवशी घर सोडले आणि ते साताऱ्यात दाखल झाले,आणि सातारा येथे त्यांनी शिकवणीचे वर्ग सुरू केले. अल्पावधीतच त्यांना साताऱ्यामध्ये “पाटील मास्तर” म्हणून म्हणून लोक ओळखू लागले.अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीमध्ये लोकांच्या वाड्या-वस्त्यामध्ये जाऊन त्यांच्या मुलांनाही कर्मवीर भाऊराव यांनी फुकट शिक्षण सुरू केले.
कर्मवीर अाण्णांनी सुरू केलेल्या कार्याला आता रूप येऊ लागले होते. त्यांना मिळणारी उत्पन्नातील मोठी रक्कम ते गरिबांच्या शिक्षणासाठी खर्च करत होते. परंतु “डांबर प्रकरण” यामध्ये त्यांना अडकवण्याचा खूप प्रयत्न केला. खोट्या साक्षी त्यांच्याविरुद्ध उभ्या केल्या,परंतु त्यातूनही आण्णा बाहेर निघाले. त्यानंतर किर्लोस्कर कंपनी बरोबर कर्मवीर आण्णा काम करत असताना कंपनीला भरपूर फायदा करून दिला त्या मोबदल्यात अाण्णांनी किर्लोस्कर यांना कंपनीच्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण काही भाग ठेवूयात आणि “कमवा व शिका”हि  योजना सुरू करावे असे त्यांनी मत व्यक्त केले.परंतु किर्लोस्करांनी ही मागणी मान्य केली नाही, त्यामुळे कर्मवीर अाण्णा त्यातून बाहेर पडले. त्यानंतर कूपर कंपनीमध्ये त्यांनी कंपनीला खूप मोठे फायदा त्यांना करून दिला. “परंतु जे किर्लोस्कर मध्ये घडले त्याचीच पुनरावृत्ती कपूर मध्ये झाली होती”.
बहुजन समाजाने शिक्षण घेतले पाहिजे हा विचार कर्मवीर भाऊरावांच्या मनात आला,आणि 4 ऑक्टोबर 1919 रोजी विजयादशमीला “रयत शिक्षण संस्था” स्थापन झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात “रयतेचे राज्य”असे संबोधले होते तर शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन राज्य करणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांनी “रयत”हा शब्द वापरला आणि आता त्यांचे शिष्य भाऊराव पाटील यांनी आपल्या संस्थेचे नाव “रयत शिक्षण संस्था” असे ठेवले. या शिक्षण संस्थेमध्ये पुढे त्यांनी 1919 मध्ये एक विद्यार्थी वसतिगृह सुरू केले. ज्यामध्ये सर्व जातीधर्माचे मुले एकत्र राहत होते. या वसतिगृह मध्ये कर्मवीरांची पत्नी लक्ष्मीबाई केवळ अाण्णांच्या संस्कारामुळे त्या ठिकाणी स्वयंपाक करत होत्या. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या वसतिगृहाचा हा प्रयोग “देशातील पहिलाच प्रयोग” होता. पुढे 1924 सातारा येथे वसतिगृह सुरू केले.
शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात काम करत असताना इतर लोकांच्याकडून त्यांना सतत त्रास होत असतं, त्याचप्रमाणे बोर्डिंग मधील मुलाकडून भोजनाला खर्च होईल तेवढे पैसे सुद्धा मिळणे मुश्कील होते.अशा परिस्थितीत त्यांनी “स्वावलंबी शिक्षण” हे रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य ठरवले आणि सातारच्या राजघराण्यातील मालकीच्या “धनिणीची बाग” व “काकडे बाग’ नावाच्या दोन बागा खंडाने घेतल्या. या बागेत सर्व प्रकारची फळे, भाजीपाला, पिकू लागला आणि त्याचप्रमाणे त्या बागेतच विद्यार्थी स्वतः स्वयंपाक करू लागले.
महात्मा गांधी यांच्या हस्ते “राजर्षी शाहू बोर्डिंग हाऊस” उद्घाटन करायचे होते, परंतु कर्मवीर अाण्णांच्याबद्दल काही लोकांनी गांधीजींना उलटसुलट सांगून त्या कार्यक्रमाला येण्याचे टाळले.परंतु अाण्णांचा अंगी असणारा कणकरपणा, जिद्द, चिकाटी यामुळे कर्मवीर आण्णा त्यांना संस्थेच्या उद्घाटनाला घेऊन आले,आणि आपल्या कार्याची ओळख त्यांना सांगितली “राजर्षी छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस” असे लिहिलेल्या नामफलकाचे अनावरण गांधीजींच्या हस्ते करण्यात आले.
कर्मवीर भाऊरावांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यात त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी खूप मोलाचे सहकार्य केले माहेरकडून मिळालेले तब्बल 90 तोळ्याचे दागिने त्यांनी ज्या-ज्यावेळेस या कार्यात गरज पडेल त्या वेळेस त्यांनी ते दिले होते. स्वतःच्या मुलाप्रमाणेच  मुलांची काळजी या दोन्ही दाम्पत्याने घेतलेली आपणास दिसून येते. 
वसतिगृहात एकदा धान्य संपले होते. त्यावेळेस लक्ष्मीबाईंनी स्वतःचे मंगळसुत्र म्हणजे आपल्या सौभाग्याचा दागिनाही या मुलांसाठी गहाण ठेवला असा हृदय पिळवटून टाकणार प्रसंग त्याठिकाणी घडला. त्यांना या कार्यात अाण्णांना जास्त साथ देता आली नाही. त्यांचा आकस्मित मृत्यू झाल्यामुळे 
वसतिगृहातील मुले आईच्या प्रेमाला पोरकी झाली.
कर्मवीर भाऊराव यांना ग्रामीण भागात प्रत्येक गावात खेड्यापाड्यात शाळा असली पाहिजे असे मनापासून वाटायचे त्यासाठी भाऊरावांनी “व्हालंटरी स्कूल” योजना सातारा जिल्ह्यामध्ये सुरू केली.जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाबरोबरच माध्यमिक शिक्षण मुलांना मिळावे, म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे कर्मवीरांना नेहमी सहकार्य असायचे त्यामुळे त्यांच्या आठवणीतच हायस्कूलला “महाराजा सयाजीराव हायस्कूल” असे नाव देण्यात आले तसेच कर्मवीरांनी फलटणच्या राजसाहेबांच्या सातारा येथील “फलटण निवास” या बंगल्यात हायस्कूल सुरू केले.
कर्मवीर आण्णांच्या अथक प्रयत्नाने शाळा सुरू झाल्या, पण त्यासाठी प्रशिक्षित शिक्षक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे शिक्षक गरजेचे होते म्हणून त्यांनी “महात्मा फुले अध्यापक विद्यालय” व “जिजामाता अध्यापक विद्यालय” हे सातारा मध्ये सुरू केले. तसेच लोणंद याठिकाणी “मालोजीराजे विद्यालय” व राणीसाहेबांच्या नावाने “लक्ष्मीदेवी वसतिगृह” सुरू करून खंडाळा तालुक्यातील दुष्काळी गावातील 
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली.
संत गाडगे महाराज यांना एका कार्यक्रमाच्या वेळेस कीर्तनासाठी निमंत्रित केले होते.त्यावेळस गाडगे महाराज यांनी कर्मवीर आण्णांच्या शैक्षणिक कार्याचा उल्लेख करून त्यांना मदतीसाठी कीर्तनातून अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रचार केला.
सातारा येथील एका कॉलेजचे नाव बदलण्यासाठी एका धनिकांनी भाऊरावांना स्वतःचे नाव देण्याच्या अटीवर देणगी देण्याचा विचार केला. तेव्हा आण्णा म्हणाले,”एक वेळ जन्म दिलेल्या बापाचे नाव बदलेल, पण सदर कॉलेजला दिलेले छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कदापि बदलणार नाही”असे ठणकावून सांगितले.
अशा प्रकारे कर्मवीरांनी अखंड महाराष्ट्रभर आपल्या”रयत शिक्षण संस्थेच्या”अनेक शाखा उभारून शिक्षणाची ज्ञानगंगा खेडेपाड्यात पोहोचवल्यामुळे त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने
“पद्मभूषण”पुरस्कार,पुणे विद्यापीठाने “डिलीट” ही सन्माननीय पदवी दिली. असे कितीतरी पुरस्कार,पदव्या त्यांना बहाल केल्या.परंतु असे अविरत कष्ट करणारे हे महान व्यक्तिमत्व 9 मे 1959 रोजी अखेरचा निरोप घेऊन ते आपल्यातून निघून गेले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकरकडून विनम्र अभिवादन. त्यांनी पेटवलेली ज्ञानगंगेची अखंड ज्योत अजूनही तेवत आहे. 
*गणेश तांबे…..🖋️*
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!