फलटण / प्रतिनिधी – संत शिरोमणी नामदेव महाराजांनी ७०० वर्षापूर्वी श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान ही पायी यात्रा करुन भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला . त्यानंतर कोणीही महाराष्ट्राबाहेर हे कार्य पुढे चालविले नाही . आज श्री विठ्ठल कृपेने संत नामदेव महाराजांचे हे कार्य पुढे नेण्याचे भाग्य आपल्याला लाभत आहे . ही यात्रा एक ऐतिहासिक परिक्रमा असल्याचे मत भागवत धर्म प्रसारक समितीचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी व्यक्त केले .
भागवत धर्म प्रसारक समिती , पालखी सोहळा पत्रकार संघ , नामदेव समाजोन्नती परिषद व श्री नामदेव दरबार कमिटी , घुमान ( पंजाब ) यांनी आयोजित केलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान ( पंजाब ) या सायकल यात्रेत सहभागी होणाऱ्या सातारा जिल्ह्यातील सायकल यात्रींची तसेच फलटण तालुक्यातील शिंपी समाज व वारकरी सांप्रदायाची बैठक फलटण येथील श्री विठ्ठल मंदिरात पार पडली .
या बैठकीस पालखी सोहळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुभाष भांबुरे , खजिनदार मनोज मांढरे , श्री विठ्ठलाचे मुख्य पुजारी सुनील गुरव , नामदेव समाजोन्नती परिषदेचे उपाध्यक्ष संजय नेवसकर , सरचिटणीस डॉ अजय फुटाणे , अरविंद मेहता , प्रा.रमेश आढाव,विक्रांत डोंगरे , जेष्ठ सायकलपटू डॉ . राजगोपाल खंडेलवाल , चंद्रकांत मिसाळ , शिरीष जोग , शिंपी समाजाचे अध्यक्ष विजय उंडाळे , उपाध्यक्ष श्रीकांत मुळे , करण भांबुरे , सुनील पोरे , ज्ञानराज पोरे ,मोहन जामदार,स्वप्नील जामदार,राजाभाऊ गाटे , शेखर हेंद्रे , विजय कुमठेकर , दत्तात्रय पवार,नितीन चांडावले,राजेंद्र कुमठेकर, शाम गाणबोटे आदी समाज बांधव व वारकरी उपस्थित होते .
भिसे म्हणाले , श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान ही २३०० किलोमीटरची सायकल यात्रा ४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या दरम्यान होणार आहे . कार्तिक शुध्द एकादशी या संत नामदेव महाराजांच्या जयंती निमित्त त्यांच्या पंढरपूर येथील जन्मस्थानावरुन निघणार आहे . या सायकल यात्रेत राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीयस्तरावरील शंभर पेक्षा अधिक सायकलपटू सहभागी होणार आहेत . या सायकल यात्रेसाठी अनेक दानशूर दाते मदतीचा हात देण्यासाठी पुढे येत आहे ही अभिमानाची बाब आहे . आम्हाला विश्वास आहे की श्री विठ्ठल व संत नामदेव महाराज हे कार्य सिध्दीस नेतील .