सातारा दि. 19 (फलटण टुडे ):
स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट 2022 रोजी अमृत सरोवरस्थळी स्वातंत्र्य संग्राम सैनिक, त्याचे परिवारातील सदस्य, स्वातंत्र्यानंतरच्या काळातील शहीद जवानांच्या परिवारातील सदस्य यांचे हस्ते ध्वजारोहण व वृक्षारोपण करण्यात आले व अमृत सरोवर लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पाडला.
कार्यक्रमासाठी गावातील लोकप्रतिनिधी, महिला- पुरुष, तरुण युवक युवती तसेच शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी – विद्यार्थीनी सहभागी झाले होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने केंद्र सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून व संयोजनातून प्रत्येक जिल्ह्यात एकूण 75 अमृत सरोवर पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठरवून दिलेले आहे. जिल्ह्यासाठी ठरवून दिलेल्या एकूण उद्दीष्टांमध्ये नवीन तलाव/ जलाशय तयार करणे, अस्तित्वात असलेल्या तलाव / जलाशयांचे पुर्नरुजीवन करणे व गाळ काढणे यांचा समावेश असून यांनाच अमृत सरोवर असे संबोधण्यात आले आहे.
अमृत सरोवरच्या निर्मितीसाठी प्रभावी अंमलबजावणीकरिता सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 85 अमृत सरोवरांची कामे निवडली आहे. ही कामे 15 ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. 85 कामांपैकी 14 कामे ही दिनांक 15 ऑगस्ट 2022 अखेर पूर्ण करण्यात आलेली आहेत. यामध्ये खटाव तालुक्यातील आवारवाडी / विसापूर, मांजरवाडी, येळीव, कोरेगाव तालुक्यातील भांडारमाची, चिमणगाव, राऊतवाडी, नागेवाडी, भाडळे माण तालुक्यातील मोही, आंधळी फलटण तालुक्यातील मानेवाडी, तरडफ, वेळोशी, वाखरी, कुरवली बु., नांदल, मुळीकवाडी या कामांचा समावेश असून सदर अमृत सरोवरांची कामे लघुपाटबंधारे विभाग जि.प. सातारा, मृद व जलसंधारण विभाग, सातारा, कृष्णा सिंचन विभाग, सातारा व वन विभाग, सातारा या विभागामार्फत पूर्ण करण्यात आली आहेत.
जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा व उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव यांनी उर्वरीत 71 अमृत सरोवरांची कामे कालबध्द पद्धतीने पूर्ण करण्याबाबत सर्व यंत्रणांना निर्देश दिले आहेत. तसेच लोकसहभागातून अमृत सरोवर उपक्रमात आपले योगदान द्यावे, असे आवाहनही जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले आहे.