फलटण दि.१२ ( फलटण दुडे ) :
सिस्टिमा बायो या परदेशी कंपनीने बनविलेले बायोगॅस संयत्रासोबत शेतकऱ्यांना २ बर्नरची उत्कृष्ट शेगडी, स्वयंपाकासाठी पुरेसा गॅस, शेतीसाठी दर्जेदार सेंद्रिय खत उपलब्ध होणार असून त्यासाठी फक्त ५ हजार रुपये द्यावे लागणार असल्याने फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन गोविंद मिल्क ॶॅण्ड मिल्क प्रॉडक्टसचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी केले आहे.
मानेवाडी ता.फलटण येथे गोविंद मिल्क ॶॅण्ड मिल्क प्रॉडक्टस प्रायव्हेट लिमिटेड व सिस्टीमा बायो यांच्या संयुक्त सहभागाने आयोजित ग्रीन गोविंद बायोगॅस सयंत्र पुरवठा योजनेच्या शुभारंभ प्रसंगी श्रीमंत संजीवराजे (बाबा) बोलत होते. यावेळी ग्लोबल कम्युनिकेशन सिस्टीमा बायोच्या डायरेक्टर मिस जुनाक्षी क्रूज, सिस्टीमा बायोच्या पीपल हेड डायरेक्टर मिस सेसील पाॅंम्पी, कमर्शियल डायरेक्टर अतुल मित्तल, गोविंदचे व्यवस्थापकीय संचालक धरमिंदर भल्ला, गोविंदचे संचालक श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर (बाबा) व चंद्रशेखर जगताप यांच्या सह दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बायोगॅस संयंत्रातून उपलब्ध होणारे सेंद्रिय खत (स्लरी) अत्यंत उपयुक्त
धान्य उत्पादनामध्ये खूप मागे असलेल्या या देशात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाल्यावर खास मोहिम राबवून प्रचंड धान्योत्पादन करण्यात आले, अगदी आपली गरज भागवून धान्य निर्यात करण्या इतपत धान्योत्पादन वाढले, मात्र त्यासाठी झालेल्या रासायनिक खतांच्या वारेमाप वापराने शेतीचे मोठे नुकसान झाले, मानवी आरोग्यालाही ही उत्पादने घातक ठरु लागल्याने शेतकरी पुन्हा सेंद्रिय शेतीकडे मोठ्या प्रमाणावर वळला आहे. त्याला सेंद्रिय शेतीचे फायदे कळू लागल्यामुळे सेंद्रिय शेतीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले असून त्या पार्श्वभूमीवर या बायोगॅस संयंत्रातून उपलब्ध होणारे सेंद्रिय खत (स्लरी) अत्यंत उपयुक्त असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
बायोगॅस कमी किमतीत उपलब्ध
स्वयंपाकासाठी गॅस वापरणे अनिवार्य ठरत असताना त्याच्या किमतीमध्ये झालेली आणि वरचेवर होणारी वाढ परवडणारी नसल्याने या माध्यमातून उपलब्ध होणारा स्वयंपाकाचा गॅस अत्यंत कमी किमतीत, सहजपणे उपलब्ध असून त्यासाठी वाट पहावी लागणार नाही, वाहतुकीचा खर्च नाही आणि तो निर्धोक व कमी खर्चाचा असल्याने शेतकऱ्यांचे हित त्यामध्येच असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी निदर्शनास आणून दिले.
जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी बायोगॅस उपयुक्त
जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी बायोगॅस यंत्रणा उपयुक्त असल्याचे निदर्शनास आणून देत आज संपूर्ण जगामध्ये जागतिक तापमान वाढीचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, ही तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्षलागवड व वृक्ष संवर्धना बरोबरच बायोगॅस निर्मिती उपयुक्त ठरणार असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी अनेक उदाहरणांसह स्पष्ट केले.
शेतीला जोड धंदा म्हणून सुरु झालेला दुग्ध व्यवसाय…
पूर्वी फलटण तालुक्यामध्ये दररोज ४० ते ५० हजार लिटर दूध उत्पादन होत असे गोविंदच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मुक्त संचार गोठा, मूरघास तंत्रज्ञान, दूध संकलनात अमुलाग्र बदल, दुधाला वाजवी दर आणि त्याचे वेळेवर पेमेंट वगैरे योजना प्रभावी ठरल्या असून आज तालुक्यात दररोज सुमारे ५ लाख लिटर हुन अधिक दूध उत्पादन होत असताना त्यामध्ये गोविंदने अग्रभागी राहुन दिलेले योगदान प्रेरणादायी ठरत आहे. शेतीला जोड धंदा म्हणून सुरु झालेला हा धंदा किफायतशीर, अधिक उत्पन्न देणारा असल्याने मुख्य व्यवसाय बनला असून महिला त्यामध्ये अधिक चांगले काम करीत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
२ बर्नर शेगडी सह केवळ ५ हजार रुपयात उपलब्ध :
सिस्टीमा बायोचे कमर्शिअल डायरेक्टर अतुल मित्तल यांनी ग्रीन गोविंद बायोगॅस सयंत्र पुरवठा योजने विषयी सविस्तर माहिती देवून त्याचे फायदे व महत्त्व निदर्शनास आणून देत ग्लोबल सिस्टीम बायो ही कंपनी मल्टी नॅशनल कंपनी असल्याने भारता प्रमाणे अन्य २०/२२ देशात कंपनीचे हे बायोगॅस संयंत्र लोकप्रिय झाल्याचे सांगून या कंपनीमधून तयार होणारे बायोगॅस संयंत्राला १० वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे, बाजारात या सयंत्राची किंमत ४० हजार रुपये आहे मात्र गोविंद आणि कंपनी मध्ये झालेल्या करारामुळे हे संयंत्र येथे २ बर्नर शेगडी सह केवळ ५ हजार रुपयात उपलब्ध असल्याचे सांगून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन अतुल मित्तल यांनी यावेळी केले.
*प्रती जनावर कमी खर्च व अधिक दूध उत्पादन*
प्रारंभी गोविंद फाउंडेशनचे डॉ.शांताराम गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व वृक्ष रोपे देवून सत्कार केल्यानंतर प्रास्ताविकात गोविंदच्या माध्यमातून प्रती जनावर कमी खर्च व अधिक दूध उत्पादन यासाठी केलेले व यशस्वी झालेले प्रयत्न, तज्ञांचे मार्गदर्शनातून झालेले फायदे, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळवून दिलेले अनेक फायदे याविषयी माहिती देवून गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ येथे राबविलेल्या धवल क्रांतीचे उपयुक्त परिणामांची माहिती समोर ठेवून या तालुक्यात प्रामुख्याने छोट्या शेतकऱ्यांना गोविंदने दिलेली संधी स्वीकारुन त्यांना मिळालेला लाभ याविषयी सविस्तर विवेचन केले.
चौकट
बनकर बंधू यांचा सत्कार दत्तगुरु दूध संकलन व शीतकरण केंद्र, मानेवाडीचे बनकर बंधू यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करुन परिसरातील दूध उत्पादकांना एका चांगल्या योजने विषयी माहिती दिल्याबद्दल त्यांचा दूध उत्पादकांचे वतीने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
Post Views: 25