देशभक्तीची मशाल विद्यार्थ्यांनी कायम मनात तेवत ठेवावी. – डॉ. अनिल टिके

मुधोजी महाविद्यालय येथे व्याख्यान सादर करताना प्रा डॉ. अनिल टिके ,प्राचार्य डॉ. पी. एच. कदम व इतर मान्यवर
फलटण दि.13 (फलटण टुडे )
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त ‘घरोघरी तिरंगा’ या मोहिमे अंतर्गत मुधोजी महाविद्यालय, फलटण च्या कनिष्ठ विभागामार्फत विविध उपक्रमांचे दि. 9 ऑगस्ट 2022 पासून आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मेहंदी स्पर्धा, प्रभात फेरी,  स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, किशोरी मेळावा व नवचेतना शिबिर, आरोग्य जनजागृती, चित्र प्रदर्शन व रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, माता-पालक मेळावा इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शुक्रवार दि. 12 ऑगस्ट 2022 ला ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधी यांचे योगदान’ या विषयावर  महाविद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. अनिल टिके हे मुख्य वक्ता म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. टिके यांनी स्वातंत्र्यपूर्व भारतीय इतिहास, भारतावर झालेली परकीय आक्रमणे तसेच महात्मा गांधी यांचा जीवनपट, त्यांचे सत्य, अहिंसा, सत्याग्रह या संबंधी विचार व ऑगस्ट क्रांती बद्दल  उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती सांगून त्यांच्या मनात देशभक्तीच्या नवचेतना निर्माण केल्या.
        
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. एस. आर. वेदपाठक, पत्रकार शितल अहिवळे, प्राध्यापक वृंद व विद्यार्थी बहु  संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र-संचालन प्रा. मच्छिंद्र वाघमोडे यांनी केले. उपस्थितांचे आभार उपप्राचार्य प्रा. एस. आर. वेदपाठक यांनी मानले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!