बारामती (फलटण टुडे वृत्तसेवा ):
भीमथडी ते बारामती असा हा प्रवास होताना रुई गावाने स्वतःची वेगळी परंपरा संस्कृती जपली असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक अजिनाथ चौधर यांनी केले
रुई येथे आयोजित श्रावण मासी कार्यक्रमात प्रा अजिनाथ चौधर बोलत होते या प्रसंगी अनेक मान्यवर व रुई कर उपस्तित होते.
आषाढ महिन्यातील अमावस्येनंतर म्हणजेच दिपामावस्येनंतर आषाढातील घनगर्द काळोख मागे टाकत श्रावणातील पावित्र्याचे स्वागत केले जाते. हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना म्हणजे श्रावण. श्रावण सुरु झाला की सर्वत्र निसर्गरम्य वातावरण असते. हिरवगार निसर्ग, वाहणाऱ्या नद्या, नाले हे अगदी विलोभनीय होते. श्रावणात पडणारा पाऊस हा देखील जणू जिवलग वाटणारा सखा असतो. कोणतेही नुकसान न पोहोचवणारा पाऊस अगदी उन्हाबरोबर लपंडाव खेळत असतो. श्रावण म्हणजे हर्ष, उत्साह, पवित्र्य. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रावण नक्षत्रात असतो. त्यावरून त्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावणाला खूप धार्मिक महत्व आहे. श्रावण आला की सणा-वारांची लगबग सुरु होते. म्हणूनच श्रावणाला सणाचा राजा म्हटले जाते. श्रावण पंचमीला मोठ्या उत्सहात नागपंचमी साजरी केली जाते. नागदेवतेची पूजा केली जाते. श्रावण मसारंभापासून ते षष्ठी पर्यंत महिला गाणी म्हणत, फेर धरून, विविध खेळ खेळून आनंद साजरा करतात.
संक्रोबा म्हणजे काय ?
तेराव्या शतकात दख्खन प्रदेशात तब्बल बरा वर्षे दुष्काळ पडला होता. या दुष्काळालाच दुर्गा देवीचा दुष्काळ म्हणून ओळखले जाते. विजापूरच्या आदिलशाहीमध्ये अन्न-पाण्यावाचून लोक मृत्यूमुखी पडत होते. लोक सैरभैर झाले होते. गाव सोडून चालले होते. यावेळी शिवभक्त ‘श्रीयाळ श्रेष्ठ’ या सावकाराने रायतेचे हाल पाहून आपली सारी संपत्ती आणि धनधान्य लोकांसाठी खुले केले होते. त्याची ही दानशूर वृत्ती पाहून आदिलशहाने त्याला एक दिवसासाठी राजा केले. परंतु हर्षउल्हासाने काही घटकेतच तो मृत्यू पावला. पण या काही घटकेतही त्याने रायतेच्या हिताची अनेक कामे केली. तो दिवस होता – श्रावण शुद्ध षष्ठी. म्हणून आजही हा दिवस श्रीयाळ षष्ठी म्हणून ओळखला जातो. श्रीयाळ श्रेष्ठ चा कालांतराने शिराळशेठ असा अपभ्रंश झाला. तसेच श्रीयाळ हा शिवभक्त असल्याने ग्रामीण भाषेत तो शंकरोबा म्हणून ओळखला जाऊ लागला व शंकरोबाचा सक्रोबा असा अपभ्रंश होऊन श्रावण षष्ठीचा सक्रोबा रूढ झाला.
श्रीक्षेत्र जेजुरी मध्ये जेजुरी गड आणि कडेपठार मंदिरात सक्रोबा पूजन केले जाते. श्रीयाळ श्रेष्ठची माती, बांबूच्या कामठ्या वापरून राजवाडा बनवला जातो. पुरातन काळात घरांना सजवण्यासाठी धान्याचा वापर करण्यात येई. आतमध्ये अन्न धान्यांनी भरलेली मातीची भांडी ठेवलेली असत. राजवाड्यामध्ये शिवलिंगाची स्थापना केली जाते. श्रीयाळाची मूर्ती बनवली जाते. हा राजवाडा डोक्यावर घेऊन मंदिर प्रदक्षिणा घातली जाते. आरती करून, ढोल सनईच्या गजरात विसर्जन केले जाते.
*रुई गावचा संक्रोबा*
गेल्या अनेक पिढ्यांपासून रुई गावात श्रावण षष्ठीला संक्रोबाचा उत्सव साजरा केला जातो. श्रावण आरंभापासून षष्ठीपर्यंत गावच्या तरुणीपासून ते अबाल वृद्धापर्यंत सर्व महिला फेर, फुगड्या, पारंपरिक फेरातील गाणी गात उत्सवामध्ये सहभागी होत असतात.
रुई गावातील गेनबा पांडुरंग चौधर आणि वंजारवाडीवरील रामकृष्ण विठोबा चौधर (पाटील) या कुटुंबांचा संक्रोबा उत्सवाचा मान परंपरेने चालत आलेला आहे. नंतर गावातील कै. एकनाथ व कै. मारुती गेनाबा चौधर या कुटुंबाने ही परंपरा पुढे चालवली. त्यांची मुले कै. अंबादास मारुती चौधर, पोपट मारुती चौधर, गुलाब मारुती चौधर आणि पुढे संतोष अंबादास चौधर यांनी ती चालू ठेवलेली आहे.
षष्ठीच्या दिवशी लाकडी पाटावर संक्रोबाचा चिखल व कामठ्याचा राजवाडा बनवला जातो. त्यामध्ये धनधान्य ठेवले जाते. बाहेरून करडई, ज्वारी अशा धन्यांची आरास केली जाते.
जुन्या काळात कासा काकू गावात कंदील दिवाबत्ती करत असे. त्याच्या मिणमिणत्या उजेडात या कुटुंबाने तयार केलेला संक्रोबा डोक्यावर घेऊन, त्याची घरापासून विसर्जनस्थळापर्यंत नाचत गात, फेर धरत मिरवणूक काढली जात असे. रात्रभर फेराची गाणी म्हणून शेवटी संक्रोबाचे पाणवठ्यावर विसर्जन केले जात असे.
भैरवनाथ मंदिराच्या सभोवताली वसलेल्या छोट्याशा रुई गावामध्ये या उत्सवाच्या आनंदाला पारावार नसे. प्रत्येक घरातील स्रिया मोठ्या उत्साहाने सहभागी होत असत. आजही या कुटुंबाने ही परंपरा जोपासलेली आहे.
कोरोना काळात दोन वर्षे ठप्प झालेला हा उत्सव या वर्षी पुन्हा मोठ्या आनंदाने साजरा केला जाणार आहे.
प्रा. अजिनाथ चौधर यांनी सांगितले