प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी महाराष्ट्राचे संस्कार मन घडवले : प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे

अमर शेंडे यांना सन्मानित करताना खासदार श्रीनिवास पाटील. सोबत डावीकडून रवींद्र बेडकिहाळ, सौ.स्मिता शेंडे, प्रा.मिलिंद जोशी, डॉ.यशवंत पाटणे, किरण सातरडेकर, संजीव भोसले.

फलटण : 
‘‘पैसा, वेळ आणि ऊर्जा या जीवनाच्या खर्‍या गरजा आहेत. पण आजच्या समाजाची धावपळ केवळ पैसा मिळवण्यासाठी सुरू असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत समाजाला त्याच्या भौतिकता गतीची जाणीव करून देण्याची जबाबदारी वक्त्यांवर आली आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी महाराष्ट्राचे संस्कार मन घडवले. वक्तृत्वाच्या क्षेत्रातील ते विठ्ठल होते’’, असे मत लेखक, वक्ते प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे यांनी व्यक्त केले.

एस.एम.जोशी फाउंडेशन सभागृह पुणे येथे प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने यंदाचा प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान डॉ. यशवंत पाटणे यांना खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. श्रवण संस्कृती समृद्ध करण्यासाठीं दिलेल्या योगदानाबद्दल चतुरंग प्रतिष्ठान, मुंबईचा तर वाचन संस्कृती जोपासण्यासाठी केलेल्या कामाबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे कार्यवाह अमर शेंडे यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी डॉ.पाटणे बोलत होते. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे चिरंजीव संजीव भोसले, स्नुषा सौ.रंजना भोसले आदींची उपस्थिती होती.

‘‘आज वाढता धर्मद्वेष बघितल्यानंतर समाज जीवन दुभंगत चालल्याचे दिसून येते. एका बाजूला अतिरेकी चंगळवाद बघितल्यानंतर संस्कृतीला आणि दुसरीकडे मूल्यहीन राजकारणामुळे राज्यघटनेला तडे जात आहेत. याच्यात पोटा-पाण्याचा प्रश्‍न दुर्लक्षित होत आहे. या परिस्थितीत तरुणाईने कोणाकडे पहायचे? कोणाचा आदर्श घ्यायचा? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे’’, असे सांगून प्राचार्य पाटणे पुढे म्हणाले, ‘‘आजचा समाज विवेकानंद आणि ज्ञानोबांच्या विचारांना विसरत चालला असून तो चंगळवादाकडे जास्त आकर्षित झालेला आहे. त्यामुळेच बोलणार्‍या वक्त्यांची समाजाला गरज असून या परिस्थितीतून समाजाला जागे करण्याची वेळ आली आहे.’’

खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘‘प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे वक्तृत्व म्हणजे मनन आणि चिंतन यांचा सुरेख मिलाप होता. त्यांच्या तालमीत तयार झालेले आणि त्यांचा वारसा समर्थ पुढे नेणारे प्राचार्य यशवंत पाटणे आणि प्रा. मिलिंद जोशी म्हणजे नव्या पिढीला मार्गदर्शन करणारे खंदे वक्त्याचे प्रतीक आहेत. मी आजही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा पाईक असून त्यांचे संस्कार व विचारांचे बोट मी आजही सोडलेले नसल्यामुळे आज मी उभा असल्याचे’’ सांगून, खासदार श्रीनिवास पाटील यांनी ते जिल्हाधिकारी असताना पुण्यातील साहित्य क्षेत्रातील आठवणी जागविल्या.

प्रा.मिलींद जोशी म्हणाले, ‘‘विचारांचा अखंड तेवणारा नंदादीप, वक्तृत्वाचा मानबिंदू म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्या प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी महाराष्ट्राचे समाजमन घडविण्याचे व महाराष्ट्राची श्रवण संस्कृती समृद्ध करण्याचे कार्य आयुष्यभर मनोभावे केले. या श्रवण संस्कृतीमध्येच आम्ही समृद्धपणे वाढलो. या वाटचालीत प्राचार्यांच्या वक्तृत्वाची शैली आम्ही आत्मसात केल्याची टीका आमच्यावर झाली असली तरी आम्हाला ती मान्य होती, कारण प्राचार्य शिवाजीराव भोसले हे प्रबोधनाचे विद्यापीठ असून या विद्यापीठातील मी एक विद्यार्थी आहे असेच आजही मी समजतो.’’

अमर शेंडे म्हणाले, ‘‘वाचन संस्कृतीमध्ये योगदान दिल्याबद्दल माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचा केलेला सन्मान हा निश्‍चितच प्रेरणादायी आहे. परंतु हा सन्मान माझे मार्गदर्शक गुरुवर्य रवींद्र बेडकिहाळ यांच्या साठ वर्षाच्या पत्रकारिता, साहित्य, शैक्षणिक, सांस्कृतिक या क्षेत्रातील योगदानाचा हा सन्मान आहे.’’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले. उपस्थितांचे स्वागत प्रा. मिलिंद जोशी व सौ. रंजना भोसले यांनी केले.

कार्यक्रमास महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ, साहित्य परिषद पुण्याच्या कोषाध्यक्ष सौ. सुनीताराजे पवार, सदस्य अ‍ॅड.प्रमोद आडकर, पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, डोंबिवली येथील सतीश फौजदार आदींसह मान्यवर उपस्थित होते.

 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!