महावितरणने उद्योजकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत: धनंजय जामदार

बारामती :

महावितरण संबंधित उद्योगांच्या अनेक समस्या प्रलंबित असून त्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केली आहे. महावितरणच्या बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या उपस्थितीत ऊर्जा भवन येथे आयोजित उद्योजकांच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. नुकतीच लादलेली अन्यायकारक वीज दरवाढ, पणदरे एमआयडीसीसाठी स्वतंत्र फिडर निर्माण करणे, नवीन कनेक्शन साठी होणारा विलंब, वारंवार खंडित विद्युत पुरवठ्यामुळे यंत्रसामुग्रीचे होणारे नुकसान, गैरसोयीच्या जागेतील रोहित्रांचे स्थलांतर, कमी उंचीच्या विद्युत वाहक तारांमुळे होणारे अपघात, आपत्कालीन वाहनाची सेवा, देयकांचा विलंब टाळण्यासाठी ई-मेल प्रणालीचा प्रभावी वापर, टेक्स्टाईल पार्क मधील भूमिगत विद्युत वाहिनी कार्यान्वित करणे आदी समस्या उद्योजकांनी उपस्थित केल्या व याबाबतचे निवेदन मुख्य अभियंता यांना देण्यात आले.

उद्योग क्षेत्रातून महावितरणला सर्वाधिक महसूल प्राप्त होत असतो यामुळे औद्योगिक ग्राहकांना परिपूर्ण सेवा सुविधा देण्यासाठी महावितरण नेहमीच प्रयत्नशील असते परंतु बारामतीतील उद्योजकांनी मांडलेल्या समस्यांची महावितरणने गांभीर्यपूर्वक नोंद घेतली असून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन च्या नेतृत्वाखालील उद्योजकांच्या शिष्टमंडळाला यावेळी दिली.

महावितरणचे कार्यकारी अभियंता गणेश लटपटे, प्रकाश देवकाते, उपअभियंता मोहन सुळ, धनंजय गावडे शाखा अभियंता अमोल चांगण, बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, मनोज पोतेकर, हरीश कुंभरकर, कॉटनकिंग चे खंडोजी गायकवाड, पियाजिओ चे प्रमोद जाधव, उद्योजक संजय पवार, उज्वल शहा, सुनील पवार, शार्दुल सोनार, विजय झांबरे, हेमंत हेंद्रे, भारत मोकाशी यांच्यासह पणदरे व बारामती एमआयडीसीतील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!