सातारा, दि. 8 : कृषि क्षेत्रात उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळपीकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपीकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळपीकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळपीकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण देऊन त्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी राज्यामध्ये हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तरी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत हवामान आधारीत फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येईल. शेतकऱ्यांनी ज्या शेतातील अधिसूचित फळपिकाचा विमा उतरावयाचा आहे, त्या शेताचा 7/12 उतारा व खाते उतारा (8 अ) घेऊन आपले ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते आहे त्या ठिकाणी आपला विमा हप्ता भरावयाचा आहे. तसेच सार्वजनिक सुविधा केंद्रामार्फत व विमा कंपनीच्या संकेतस्थळावरुनही विमा हप्ता भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 7/12 उतारा प्राप्त होत नसल्यास शेतात अधिसूचित पिक असल्याचे स्वयं घोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, मंडल कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.