अजित काटकर यांचा वंशाचा दिवा हा कथासंग्रह म्हणजे मनोरंजनाचा खजिना.

म्हसवड :

माणसारख्या दुष्काळी व ग्रामीण भागात राहून म्हसवड येथील सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर काॅलेजमध्ये आपला शिक्षकी पेशा सांभाळत त्यांनी पत्रकारिता आणि कथालेखन सातत्याने सुरू ठेवले आहे हे कौतुकास्पद आहे. दुष्काळाचे चटके सहन करत जीवनातील धगधगती वास्तवता अनुभवत काटकर यांनी आजवर केलेले लिखाण हे वास्तववादी झाले आहे. त्यामुळेच ते वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे ठरले आहे असे म्हणावेसे वाटते.

माणदेशाला  मोठा साहित्यिक वारसा लाभला आहे. हाच वारसा एक सच्चा वारसदार म्हणून अजित काटकर चालवित आहेत. अजित  काटकर यांचे यापूर्वी भंडारा,खोडाला बाजा हे कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या काही कथांवर चित्रपटही निघत आहेत. कथा लेखन करणे हा एक साहित्याचा असा अविष्कार आहे की, त्यासाठी व्यासंग जोपासावा लागतो. कथालेखकाकडे तशी निरीक्षण दृष्टी असावी लागते. ही निरीक्षण दृष्टी, ग्रामजीवनातील अनेक बारकावे, ग्रामीण भागात रहाणाऱ्या विविध व्यक्तींच्या व्यक्तीछटा, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये यांचा  काटकर यांचा चांगला अभ्यास आहे. आमच्या गुंफण अकादमीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या माजी खासदार श्रीमती प्रेमलाताई चव्हाण राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेत ते सहभागी होतात. त्यांना त्यामध्ये वेळोवेळी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

       अजित काटकर हे स्वतः एक व्यासंगी शिक्षक आहेत त्यांना शिक्षणक्षेत्रातील अनेक पुरस्कार देऊन गॊरवले आहे.  त्यांच्या ठायी एक संमृद्ध असा लेखक वसलेला आहे. त्यामुळे त्यांचा साहित्यलेखनाचा प्रवास हा अतिशय चांगल्या पध्दतीने झाला आहे. त्यांच्या साहित्यामध्ये मानवी संवेदनांचा वेध घेण्याची ताकद आहे. त्यांच्या ‘वंशाचा दिवा’ या कथेतून मानवी संवेदनांबरोबरच मानवी स्वभावाचे आणि एकूण समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. सुरजच्या शिक्षणासाठी गणपत आणि सारजाबाई यांनी केलेला त्याग आणि आपल्या भावासाठी शिक्षण अर्धवट सोडणारी सुरजची बहिण सुमन या व्यक्तीरेखा त्यांनी खुप चांगल्या प्रकारे रेखाटल्या आहेत.

त्यांच्या ‘ससेहोलपट’ या कथेत धोंडीबा नावाच्या शेतकऱ्याची शेती करण्याची धडपड. त्याची बायको सारजा हिला शेतात झालेली जखम आणि त्यानंतर शहरात गेल्यावर दंगलीमुळे त्याची झालेली मनाची घालमेल तसेच शेवटी सदा पुढाऱ्याने धोंडीबाला केलेली मदत हे चित्र लेखकाने अतिशय चांगल्या पध्दतीने रंगवले आहे.

‘ईर्षा’ ही त्यांची ग्रामीण बाजाची आणखी एक कथा यामध्ये किसना पाटील आणि दादा पाटील यांच्यातील संघर्ष चित्रीत करण्यात आला आहे. बेंदराच्या सणानिमित्त माझी बैलं एक नंबरला पाहिजेत असा अट्टाहास करणारा किसना पाटील हा दादा पाटलाची बैलं विष घालून मारतो, गुन्हा कबुल करतो आणि शिक्षा होणार त्यादिवशी कोर्टात दादा पाटील आपली केस मांगे घेतो आणि त्याची मुक्तता होते. हे मनाचे औदार्य दाखविणारा दादा पाटील आणि पश्चाताप झालेला किसना पाटील नवी बैलजोड घेवून वाजत गाजत दादा पाटलाला भेट देतो प्रसंग ग्रामीण जीवनातच घडू शकतात. ग्रामीण जीवनातील माणसं मनाची किती मोठी असतात आणि आपल्या चांगल्या वागण्यामुळे पशुवत वागणाऱ्या व्यक्तीला पश्चाताप होती. अशा प्रकारच्या संवेदना मानवी मनामध्ये निर्माण करू शकणारे काटकर यांचे कथालेखन आहे.

‘पांदीतलं भूत’ या कथेतील रामा आणि ढालपे गुरुजींची झालेली धडक आणि त्यातून देवऋषी कसा लाभ उठवतो,अंधश्रद्धा निर्मूलन या विषयाला वाहिलेली ही  कथा त्यांनी उत्कृष्ठपणे रंगवली आहे. ‘सौदा’ या कथेमध्ये दौलतीची त्याचा मुलगा गणपत याच्या लग्नसाठी ग्रामीण भागातील पित्याची धडपड कशी असते .नाकर्त्या मुलाच्या लग्नासाठी दॊलतीच्या चांगल्या चाललेल्या संसाराची कशी धुळधान होते याचे उत्तम उदाहरण चित्रीत केले आहे
   त्यांच्या ‘जत्रा’ या कथेत दादा पाटलाची रंगवलेली व्यातरेखा ही घरंदाज पाटील कसा असतो हे सांगून जाते. गावच्या जत्रेत स्वत:ला कितीही फटका बसला तरी जत्रा मात्र निर्विघ्नपणे पार पडली पाहिजे असे सोज्वळ विचार असणारे दादा पाटील.रंगराव हे खलपात्र दादा पाटलाला प्रत्येक कामात आडकाठी आणुन रंगाचा बेरंग करणारे आहे. दोघांमधील संघर्ष अजित काटकर यांनी चांगलाच रंगवला आहे. ‘इलेक्शान’ या कथेत गावच्या निवडणूकांचे प्रातिनिधीक चित्र रंगवले आहे. यामध्ये गावपातळीवर निवडणुकीत वापरल्या जाणा-या गावगुंड्या, मतदारांना आपल्याकडे खेचुन घेण्यासाठी वापरल्या जाणा-या युक्त्या मनोरंजक भाषाशॆली वापरून रंगवल्या आहेत. ‘नारदाचे पृथ्वीभ्रमण’ या विनोदी कथेमध्ये पृथ्वीवर माणूस कसा वागतो आणि तो किती स्वार्थी बनला आहे याचे हुबेहुब वर्णन केलेले आहे.नारदाला पृथ्वीतलावर राहण्यासाठी किती संघर्ष करायला लागतो त्याचे मनोरंजक व काल्पनिक चित्र आपणासमोर या कथेतुन उभे राहिल्याशिवाय राहात नाही.
        अजित काटकर यांच्या ‘फटफजिती’ मध्ये सदा या जावयाची पहिल्या दिवाळसणाला जाताना झालेली फजिती चित्रीत केली आहे. इरसाल सासरा आपल्या जावयाशी कसा वागतो हे चित्र रेखाटले आहे.
          अशाच प्रकारच्या त्यांच्या ‘शिरप्याचा ट्रॅक्टर’ या कथेचा नायक शिरप्या आपल्या टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ ट्रॅक्टर तयार करण्याच्या व तो तयार झाल्यावर पुढे काय गमतीदार प्रसंग घडतात हे विनोदी पद्धतीने मांडले आहे.
‘हाडाचा मास्तर’, या कथेत जुन्या काळातील एका इरसाल शिक्षकाच्या नोकरीतील व शाळा तपासणीला आलेल्या साहेबांच्या  गमती जमती विनोदी पद्धतीने मांडल्या आहेत.
गोष्ट एका चोरीची’ या कथेत सेटच्या घरी चोरी होते त्याचे सांत्वण करण्यासाठी येणा-यांनी सदाची कशी फजिती केली,पोलिसांनी तपासाच्या नावाखाली मटणावर मारलेला ताव या कथेत विनोदी पद्धतीने रेखाटला आहे
ही व इतर सर्व कथा वाचकांच्या मनाचा ठाव घेण्याऱ्या ठरतील यात शंका नाही.
          अजित काटकर यांचा हा लेखन प्रवास नेहमीच वाचकांच्या मनाचा ठाव घेणारा ठरला असून मानवी मनाची संवेदना जागृत करणाऱ्या ग्रामीण भागाचे वास्तव चित्रण करणाऱ्या, ग्रामीण भागातील इरसाल व्यक्तीरेखा जीवंत करणाऱ्या कथा ही काटकर यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगता येतील. ग्रामीण भागाची नाळ घट्ट असणारा हा कथालेखक मराठी भाषेची निस्सीम सेवा करीत आहे. त्यांच्या साहित्यलेखनामुळे माणदेशी मातीचा सुगंध सातारा जिल्ह्यातच नव्हे तर मराठी सारस्वताच्या अंगणामध्ये कायमस्वरूपी दरवळत राहील असा मला विश्वास वाटतो. काटकर यांचा हा कथासंग्रह मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घालणारा ठरेल. त्यामुळे वाचकांनीही या कथासंग्रहाचे स्वागत करावे अशी विनंती मी यानिमित्ताने करतो.
          अजित काटकर यांच्या हातून यापुढील काळातही असेच लेखन होत राहो यासाठी माझ्या व गुंफण परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा…!

परिक्षण —– बसवेश्वर चेणगे 

                 अध्यक्ष, गुंफण अकादमी मसूर,
पुस्तकाचे नाव — वंशाचा दिवा
लेखक ———– अजित काटकर
प्रकाशक ——— अभिनंदन प्रकाशन,कोल्हापूर.
पृष्ठे —— १२०
किंमत —– १७० रु.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!