पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचे परिणाम दैनंदिन जीवनातही दिसू लागल्याने याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने 1972 साली युनोच्या एका परिषदेत पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरले. पर्यावरण रक्षणाचे महत्त्व आणि संवर्धनाची गरज लक्षात घेऊन विविध प्रकल्प राबविले जात आहेत. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.
पर्यावरणाचे जतन, संवर्धन केले पाहिजे यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जातात. निसर्गाशी असलेले नाते दृढ करण्यासाठी आपली वसुंधरा जपणे गरजेचे आहे. आपली वसुंधरा समृद्ध असावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ‘माझी वसुंधरा अभियान 2.0’ ऑक्टोबर 2020 पासून सुरु केले. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित असलेले ‘माझी वसुंधरा अभियान’ हे पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.
पंचतत्त्वावर आधारित पर्यावरण संवर्धन
पृथ्वी तत्त्वाशी संबंधित वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे संवर्धन या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. वायू तत्त्वाचे संवर्धन करता यावे म्हणून हवेच्या गुणवत्तेसाठी वायूप्रदूषण कमी करुन हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे अपेक्षित आहे. त्यासाठी सायकल रॅली, कार्यालयात वाहन विरहित दिवस निश्चित करून सायकलचा वापर करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
जलतत्त्वाशी संबंधित नदी संवर्धन, सागरी जैव विविधता, जलस्त्रोतांचे संवर्धन व संरक्षण याचा समावेश आहे. अग्नी तत्त्वाशी संबंधित उर्जेचा परिणामकारक वापर, ऊर्जा बचत तसेच ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन देणे, अपारंपारिक उर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा, पडीक जमिनी, शेतांचे बांध यासारख्या जागांवर राबवणे आणि आकाश या तत्त्वास स्थळ व प्रकाश या स्वरुपात निश्चित करुन मानवी स्वभावांतील बदलासाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमातून जनमानसात बिंबवणे या प्रमुख बाबींचा समावेश या अभियानात करण्यात आला आहे.
*निसर्गपूरक जीवनपद्धती*-
निसर्गाच्या या पंचतत्त्वासोबत जीवनपद्धती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैवविविधतेचेही अस्तित्व राहणार नाही. या उद्देशाने स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेऊन निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना करुन निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात पुणे, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे अडीच लाख वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
वृक्षगणना,रोपवाटिकेची निर्मिती,वृक्ष आराखडा,एकल वापर प्लास्टिक बंदी,घनकचरा व्यवस्थापन,जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन,ई-कचरा व्यवस्थापन,निगडीत फटाक्यांवर बंदी घालण्याच्या दिशेने पुढाकार, राडारोडा कचऱ्याचे व्यवस्थापन,कृषी कचरा व्यवस्थापन, उज्ज्वला योजना आणि गॅस जोडणी, रेन वॉटर हार्वेस्टिंग,विहीर पुर्नस्थापना उपक्रम,पर्यावरणपूरक मूर्तीचा प्रचार,सौर ऊर्जेला प्रोत्साहन अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनासाठी निश्चितच मदत होणार आहे.
*“पुणे प्लॉगेथॉन 2022”*-
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पुणे महानगरपालिकेतर्फे 5 जून रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत प्लॉगेथॉन (जॉगिंग विथ पिकिंग अप लिटर) मोहिम राबविण्यात येत आहे. व्यक्तिगत आरोग्य उत्तम राखण्यासाठी अनेकांना सकाळी फिरण्याची सवय असते.याला कचरा संकलनाची जोड दिल्यास समाजासाठीही काही केल्याचे समाधान या जॉगर्सना लाभू शकेल. पुणे शहरातील एकूण 134 रस्ते यासाठी निश्चित करण्यात आले आहेत. त्याच बरोबर विविध टेकड्या रामनदी,पुणे शहरातील विविध नदी घाट व क्रॉनिक्स स्पॉट या ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे.
पर्यावरण आणि आपले नाते जिवाभावाचे आहे. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतीचा केवळ निसर्ग नाही, तर हवा, पाणी, जमीन, वनस्पती या सर्वांनी मिळून पर्यावरण बनते. मानवाला जगण्यासाठी या सर्वांची गरज असते. त्यामुळे आपल्या सर्वांवर सर्वात मोठी जबाबदारी आहे ती पर्यावरण रक्षणाची. या जबाबदारीचे भान करून देण्यासाठीच पर्यावरण दिन आहे.
*गीतांजली अवचट, माहिती सहायक*
*विभागीय माहिती कार्यालय, पुणे.*