भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चषक फलटणच्या बुद्धिबळ स्पर्धेचा पुण्यातील ओम लामकाने विजेता

उदघाटन प्रसंगी बुद्धिबळ खेळताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) व सस्तेवाडी ग्रामपंचायत सरपंच सौ.ज्ञानेश्वरी कदम व उपस्थित मान्यवर


फलटण दि.२४ :
 डीप माईंड चेस अकॅडमी फलटण आयोजित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चषक खुली बुद्धिबळ स्पर्धा मुधोजी महाविद्यालय फलटणच्या प्रशस्त बहुउद्देशीय भवनात पार पडली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुंबई, नाशिक, सोलापूर, पुणे, सांगली व सातारा अशा विविध जिल्ह्यातून तब्बल ११६ स्पर्धक आले होते.
       या स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद मा.अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी स्पर्धेचे प्रायोजक सस्तेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.ज्ञानेश्वरी कदम, उपसरपंच श्री.बापूराव शिरतोडे, एल.बी.एच.एम संस्थेचे अध्यक्ष नागनाथ हळकुंडे, ताय्यापा शेडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
       भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चषक २०२२ चा मानकरी पुण्याचा ओम नागनाथ लामकाने ठरला. द्वितीय क्रमांक साहिल शेजाळ तर तृतीय क्रमांकाचा चषक प्रणव टंगसाळे यांनी पटकावला. १५ वर्षाखालील वयोगटात राजवर्धन दगडे ने चषकावर नाव कोरले. द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी सम्राज्ञी पाटील व विरेन डहाळे ठरले. १० वर्षाखालील वयोगटात चषकांचे मानकरी अनुक्रमे गुंजन ओस्वाल, ऋषिकेश जगदाळे व सार्थक जाधव ठरले. बेस्ट स्कूल ट्रॉफी चे मानकरी मोना स्कूल सातारा ठरले तर बेस्ट अकॅडमीचे पारितोषिक बीटीसीए बारामती यांनी मिळवले. सर्वोत्कृष्ट स्त्री खेळाडू तन्वी जाधव ठरली तर फलटण तालुक्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा चषक तानाजी सुळ आणि अनरेटेड खेळाडू फलटणचे पदक सिद्धेश माने यांनी मिळविले. सर्वोत्कृष्ट लहान खेळाडू या पदकाचे मानकरी देवव्रत शिंदे, रियान जाधव व रिवा चरणकर ठरले.
       उदघाटनपर भाषणात स्पर्धकांना शुभेच्छा देतानाच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी बुद्धिबळ खेळाचे महत्व व प्रसाराची गरज विषद केली. बुद्धी व विचारांना चालना देणाऱ्या खेळाचा उदघाटनपर कार्यक्रम पुरोगामी पद्धतीने साजरा झाला. हार, फुले, नारळ, शाल अशा सर्व पारंपरिक पद्धतींना फाटा देऊन निमंत्रितांचे स्वागत पुस्तके-पेन-रोप देऊन केले आणि कार्यक्रमाचे उदघाटन पिंपळ रोपास पाणी घालून केले याबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी आयोजकांचे कौतुक केले.
       दिवसभर चाललेल्या स्पर्धेचा सात फेऱ्यानंतर निकाल लागला. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सायंकाळी ०६.३० वाजता मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंढरीनाथ कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव, प्रा.अशोकराव जाधव, नजीर काझी उपस्थित होते. बक्षिसाची रक्कम जिल्हा परिषद शाळांचा स्वखर्चाने कायापालट करणाऱ्या समविचारी अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शैक्षणिक व सामाजिक विचार मंचचे चौधरवाडीचे अध्यक्ष कोकाटे सर यांच्या प्रायोजकत्वाने देण्यात आली. सभागृह व चषकाचे प्रायोजक फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण हे होते. 
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डीप माईंड चेस अकॅडमीचे प्रा.श्रेयस कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक डीप माईंड चेस ॲकॅडमी चे सदस्य व माजी उपसरपंच अमोल गायकवाड (तरडगांव) यांनी केले. डीप माईंड चेस अकॅडमी चे प्रमुख दिपंकर कांबळे यांनी फलटण शहरात गुणवत्तापूर्ण बुद्धिबळ प्रशिक्षण मिळावे म्हणून स्वतः पुढाकार घेऊन डीप माईंड चेस अकॅडमीची स्थापना केल्याचे सांगून आभार केले. 
       ही स्पर्धा फिडे ऑर्बिटर शार्दुल तपासे यांच्या देखरेखीखाली पार पडली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डीप माईंड चेस अकॅडमीचे दिपंकर कांबळे, सौ.संध्याराणी सस्ते-चव्हाण, प्रा.श्रेयस कांबळे यांनी परिश्रम घेतले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!