भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करून त्यामध्ये शहरवासीयांना सहभागी करुन घेतले, शहरासह संपूर्ण तालुक्यात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी शोभायात्रेचा शुभारंभ विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला. शोभा यात्रेत विविध चित्ररथामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या आकर्षक प्रतीकृती व देखावे केल्यामुळे नागरिकांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती. कोरोना मुळे गेली दोन वर्षे जयंती साध्या पद्धतीने साजरी केली गेल्यामुळे यावर्षीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
अभिवादन व आंबेडकरी नववर्षाचे स्वागत
बुधवार दि. १३ रोजी रात्री ११ वाजता बौद्ध बांधवांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनतर त्रिसरण पंचशील ग्रहण करून, रात्री १२ वाजता आंबेडकरी नूतन वर्षाचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. याप्रसंगी युवक व युवतींनी फलटणची जयंती यावर तसेच डॉ. आंबेडकर कार्य व विचार याबाबत मनोगते व्यक्त केली.
भीमज्योतीचे स्वागत
गुरुवार दि. १४ रोजी सकाळी ८ वाजता जिंती नाका येथे सासवड येथून आणलेल्या भिमज्योतीचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे व जयंती महोत्सव समिती पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर यांनी ज्योतीचे स्वागत केले.
मान्यवारांकडून अभिवादन
माजी खासदार अमर साबळे, महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप, पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे, नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोक जाधव, सनी अहिवळे, सचिन अहिवळे, सौ. वैशालिताई सुधीर अहिवळे, डॉ.प्रवीण आगवणे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, पं. स. माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, दशरथ फुले, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, जाकीरभाई मणेर, रियाजभाई इनामदार आदी मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन केले. तसेच शहर व तालुक्यातील विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. फलटण शहर व तालुक्यातील विविध सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था वगैरे ठिकाणी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
विविध उपक्रम व अन्नदान
पंचशील रिक्षा ऑटो संघटनेच्या वतीने विठ्ठल मंदिर येथे रक्तदान शिबिर व अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला. धम्मयान मित्र मंडळ, संघमित्रा मित्र मंडळ, साहस मित्र मंडळ यांच्या वतीने देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस. टी.) फलटण आगार व कामगार संघटना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा ऑटो संघटनेच्यावतीने बसस्थानकावर मान्यवरांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले त्यानंतर रिक्षा संघटनेच्यावतीने प्रवासी वर्गाला अन्नदान करण्यात आले. सोमवार पेठ येथील भिम सैनिकांनी ५०० कुटुंबांना लाडू वाटप केले.
भव्य मिरवणूक
गुरुवार दि. १४ रोजी सायंकाळी ७ वाजता पंचशील चौक, मंगळवार पेठ येथून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा व चित्ररथासह शहर व तालुक्यातील ग्रामस्थांच्या सहभागाने आकर्षक विद्युत रोषणाई व सजावटीत प्रचंड मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी मिरवणूकीचा शुभारंभ विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेवक सनी अहिवळे, सुधीर अहिवळे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, यांच्यासह जयंती मंडळाचे अध्यक्ष अनिकेत अहिवळे व पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणूक समारोप
जयंती महोत्सव समितीच्यावतीने पोलीस प्रशासन, ट्रक्टर चालक, घोडे उंट चालक, झांजपथक, लाईट डेकोरेशन, साउंड सिस्टिम व जयंती महोत्सवास ज्यांची मदत झाली त्यासर्वांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानण्यात आले. यावेळी पोलीस यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी, जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.