फलटण तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींचा समावेश
फलटण दि. १४ : फलटण टुडे
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागांतर्गत माननीय बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय उभारण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून त्यामध्ये फलटण तालुक्यातील घाडगेवाडी, बोडकेवाडी, कांबळेश्वर, तामखडा, राजाळे, निंभोरे, टाकळवाडा, शेरेचीवाडी (ढवळ), मानेवाडी या ९ गावांचा समावेश असल्याची माहिती आ. दिपकराव चव्हाण आणि सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही, अशा ग्रामपंचायतींना माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेनुसार सदरचा निधी उपलब्ध करुन देण्यात येत असून सदर योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय इमारत उभारताना ग्रीन बिल्डिंग संकल्पना अंमलात आणून नैसर्गिक प्रकाश योजना व वायुवीजन, पाणी व ऊर्जा वापरात काटकसर, पर्जन्य जल पुनर्भरण आणि जास्तीत जास्त पर्यावरण पूरक बांधकाम साहित्य व साधन सामग्रीचा वापर करणे आवश्यक असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.