फलटण दि. १३ : येथील संस्थान कालीन, ऐतिहासिक श्रीराम मंदिरातील प्रभू श्रीराम, सीता माता व लक्ष्मणाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेला आज फाल्गुन शु|| ११ (एकादशी) सोमवार दि. १४ मार्च २०२२ रोजी २४७ वर्षे पूर्ण होत आहेत.
त्यानिमित्त मंदिरात प्रभू श्रीराम, सीता माता, लक्ष्मण व हनुमानाच्या मूर्तींना वेगळा पोशाख परिधान करुन मंदिर सुशोभित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे राजघराण्यातील मंडळींच्या हस्ते प्रभू श्रीरामाची आरती करण्यात येणार आहे.
फाल्गुन शु|| ११ (एकादशी) शके १६९६ मध्ये तत्कालीन शंकराचार्यांच्या हस्ते सदर मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली त्याविधीचे पौरोहित्य काशीच्या ब्रम्हवृदांनी केले होते.
प्रारंभी केवळ चौथऱ्यावर मूर्ती बसविण्यात आल्या, नंतर गाभारा व त्यानंतर जय विजय असलेल्या बाहेरच्या मंडपाचे काम झाले आहे. त्यानंतर श्रीमंत मुधोजी महाराज यांनी अलीकडच्या कोरीव लाकडी प्रशस्त मंडपाचे काम केले.
फलटण संस्थानच्या तत्कालीन मार्गदर्शक साध्वी श्रीमंत सगुणामाता आईसाहेब महाराज यांनी त्यावेळी अन्य प्रांतात सुरु असल्याप्रमाणे येथेही श्रीराम रथोत्सव सुरु करण्याच्या दृष्टीने श्रीराम सीता मातेच्या पंचधातूंच्या मूर्ती तयार करवून घेवून त्या दरम्यान देव दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे मार्गशीर्ष शु|| १ (प्रतिपदेला) रथोत्सव सुरु केला. पंचधातूच्या मूर्ती रथामध्ये ठेवून प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष शु|| प्रतिपदा म्हणजे देवदिवाळीला प्रभू श्रीरामाचा रथ नगर प्रदक्षिणेस निघतो, त्यापूर्वी ५ दिवस श्रीराम मंदिरात प्रभावळ, अंबारी, शेष, गरुड, मारुती ही वाहने निघतात त्यांची मंदिर प्रदक्षिणा होते व सहाव्या दिवशी रथ ग्राम प्रदक्षिणा असते. त्यानिमित्त मोठी यात्रा भरते, पूर्वी ही यात्रा १५ दिवस चालत असे अलीकडे गतिमान युगात यात्रेचे दिवस कमी झाले असले तरी प्रभू श्रीराम व रथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी आजही कमी झालेली नाही.