अजित काटकर यांची ससेहोलपट ही कादंबरी समाजातील जीवघेण्या समस्येवर प्रकाश टाकणारी

पुस्तक परीक्षण

 म्हसवड दि ८ :     
 ससेहोलपट ही ग्रामीण कथाकार अजित काटकर यांचे अभिनंदन प्रकाशन कोल्हापुर यांनी आकर्षक मुखपृष्ठासह प्रकाशित केलेली कादंबरी वाचणीय आहे.
  या पुस्तकात मानवी जीवणाचे अनेक कंगोरे, भाव भावना,अपेक्षा, कष्ट,त्याग,स्वप्ने आणि अपेक्षा भंगाची ही कहानी आहे. अस्सल ग्रामीण जीवणावर आधारित असणारी कथा २१ व्या शतकातील एका जीवघेण्या समस्येवर भाष्य करते. या कादंबरीतील शब्दवेध काळजाला भिडतात.कादंबरीचा नायक दॊलती हाल अपेष्टा सहन करतो.समाजरचना जाणून घेत मोठा होतो.लग्नानंतर सुशील स्वभावाच्या राधाशी त्याचा प्रपंच सुरु होतो.त्याला वाटते लग्नानंतर आपल्या जीवणात सुख येईल अवघाची संसार सुखाचा होईल परंतु त्याचे हे स्वप्न भंगते.पाखराच्या गळ्यातील गाणी थांबतात.क्षणभर आकाशगीत शांत होते.संसार आसान नाही अपूर्ण आहे त्यामुळेच तो पूर्ण होत नाही.योगी असला तरी स्वार्थ सुटत नाही हेच खरे.सगळेजण रडत खडत संसार करतात.आनंदाचे मुखवटे परिधान करतात व आपण सुखी आहोत असे भासवतात.
     हाडाची काडे करुन अत्यंत परिश्रमपुर्वक शिकवलेला मुलगा लग्न जहाल्यावर बदलतो.भरपुर पगाराची नोकरी असुनही बायकोच्या सांगण्यावरून आई वडीलांकडे दुर्लक्ष करतो.  दॊलती व राधाच्या जीवणात दु:खाचे डोंगर कोसळतात ते त्यातुन बाहेर पडतात का? हे जाणून घेण्यासाठी हे कथानक वाचावेच लागेल.
      नव-याच्या मृत्युनंतर राधाच्या डोळ्याचे आॅपरेशन झाले पण ते त्यात काही कमतरता राहीली त्यावर पुन्हा उपचार न करता  मुलगा गणेश तीला आपल्या घरातुन गावाकडे जाण्यासाठीच्या गाडीत बसवून.देतो. ती घरी येते. सतत रडण्यामुळे तिचा डोळा निकामी होतो.गावाकडे त्यावर उपचार करण्यासाठी पॆसे मिळत नाहीत परिणामी डोळा कायमचा बाद होतो.
     मरणाला सोबत घेऊन जगण्यात काय अर्थ आहे.असे जगण्यापेक्षा मेलेले बरे आपली या यातनांमधुन सुटका तरी होईल.असे तीला वाटू लागते.
    एके दिवशी शेजारील पोराकडुन ती आपल्याकडील शिल्लक पॆशातुन राॅकेल आणते व रात्री आपल्यासह घरावर शिंपडते व शेजारी पाजारी झोपल्यावर स्वतःच आग लावून घेते. जीवघेण्या वेदना सहन करीत मृत्युला कवटाळते. राधाची ती आत्महत्या नसुन बदलत्या समाजरचनेने घेतलेला बळी असतो.
    गणेश सारखी अनेक मुले लग्नानंतर आपल्या आईवडीलाना वा-यावर सोडतात.ही आमच्या समाजाची शोकांतिका आहे. लेखकाने अत्यंत प्रभावीपणे समाजरचनेचे हे चित्र आपल्या पुस्तकातुन मांडले आहे.त्यांनी सुखांतीका लिहिण्यापेक्षा दु:खांतीका लिहिली आहे व त्यातुन समाजातील वास्तव आपल्यासमोर मांडले आहे. आपण कोणाला आवडत नाही अशीच तिची मिळणा-या वागणुकीवरून भावणा होते. आपल्या मुलाला आपण तळहातावरील फोडाप्रमाणे जपले त्याच्या शिक्षणासाठी हाडाची झाडे केली पण त्याने तीला संभाळण्यापेक्षा बायकोच्या सांगण्यावरुन अवहेलना केली. अशा प्रकारामुळे समाजामध्ये वृद्दाश्रमांची संख्या वाढत आहे.अशी वृद्ध माणसे आपल्या मुलाबाळांचा मोह न ठेवता उर्वरीत जीवण एकाकीपणे संपवतात.भारतीय विचार धारेशी मिळते जुळते नाही व आपल्या संस्कृतीतही बसत नाही.
      वृद्धावस्थेत घरातील बुजुर्ग व्यक्तींकडे दुर्लक्ष करणे ही आमच्या समाजाची शोकांतिका आहे.ती शोकांतिका लेखकाने अगदी प्रभावीपणाने मांडली आहे.
      पाखरांनी आत्महत्या करावी असे आजकालचे वातावरण आहे.त्यामुळे पालक आपल्या मुलांकडे जाणीवपूर्वक लक्ष देतील किंवा पहिल्यासारखे लक्ष देणार नाहीत त्यात प्रेम,वात्सल्य,माया ममता स्नेह शांती असणार नाही.जी मुले आपल्यासाठी काही करणारच नाही त्यांच्यासाठी आपण आपला वेळ का घालवावा अशी एक विचारधाराही वाढु लागेल आणि ही विचारधारा कुटुंबव्यवस्था उध्वस्त करुन टाकू शकेल.हीच विचारधारा लेखकाने आपल्या या कादंबरीत मांडली आहे,समाजातील जाणकारांनी यावर जरुर विचार करावा.
   अजित काटकर हे माण तालुक्यातील सामाजिक, शेक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे लेखक आहेत.समाजातील अशा समस्यांनी ते अस्वस्थ होतात अशा अस्वस्थ होण्यातुनच सामाजिक भान असणा-या  ससेहोलपट या कादंबरीचा विषय त्यांना सुचला व त्यांनी या कादंबरीची निर्मिती केली आहे. काटकर यांच्या लिखानाचा बाज साधा सोपा सहज  प्रवाही आहे.लेखनामध्ये आलंकारीक शब्द नसले तरी कादंबरीमध्ये विनाकारण केलेला बोजड शब्दजंजाळही नाही.त्यामुळे मुख्य विषय वाचताना चटकन समजतो  व वाचकांच्या मनाचा ठाव घेतो.
    माण तालुक्यात कायम दुष्काळ व लोकनेत्यांचे दुर्लक्ष यासारख्या विषयांवर लेखन करता येईल.पण अजित काटकर यांनी सामाजिक भान राखून हा विषय निवडला असावा असे वाटते.त्यांचा पिंड स्वभाव व चिंतन लक्षात घेता त्यांचा लेखन प्रवास योग्य दिशेने सुरु असल्याचे लक्षात येते.
   अजित काटकरांच्या घरात साहित्याचा वारसा नाही तसे वातावरणही नाही पण त्यांचे लेखन वाचताना २१ व्या शतकात त्यांचा भविष्यकाळ उज्वल आहे. आम्ही साहित्य क्षेत्रात त्यांचे स्वागत करतो.
     ससेहोलपट हे अजित काटकर याचे सहावे पुस्तक आहे.यापूर्वी त्यांची भंडारा,खोडाला बाजा,एका लग्नाची गोष्ट हे कथासंग्रह तर देवमाणूस ही कादंबरी लिहिली आहे. धाडसाचे फळ हा बालकथासंग्रहही त्यांनी.लिहिला आहे.त्यांच्या अनेक कथांचे वाचन सातारा, सांगली आकाशवाणी व माणदेशी तरंग वाहिनी म्हसवड वर  करण्यात आले आहे.
अजित काटकर हे  दिवाळी आवाज,गुंफण,साहित्य स्वानंद,अपेक्षा, मुक्तागिरी,ऊंसमळा,सकाळ,तेजस्विता,यासारख्या महाराष्ट्रातील नामवंत दिवाळी अंकांमधुन गेल्या अनेक वर्षांपासुन सातत्याने लेखन करीत आहेत.तरुण भारतच्या रविवार पुरवणीतही त्यांच्या कथा.प्रसिद्ध झाल्या.आहेत. प्रतिलिपी या अॅपवर त्यांच्या कथा वाचकांची संख्या एक लाखांचे वर गेली आहे. असा हा बहुआयामी लेखक माणदेशाचा माणिक मोती.आहे.

         पुस्तकाचे नाव.     ससेहोलपट
         लेखक.               अजित काटकर
         प्रकाशक.           अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर
        परिक्षक              सी डी पवार. (बावधन,  ता वाई )

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!