बारामती :
“मराठी भाषेला दोन हजार वर्षांपूर्वीचा गौरवशाली इतिहास असून या भाषेला अभिजात दर्जा मिळावा.” असे प्रतिपादन बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचतील मराठी विभागाचे डॉ. श्रीराम गडकर यांनी कुरवली येथे व्यक्त केले. ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून सह्याद्रीवेडे सामाजिक संस्था व कुरवली, ता.इंदापूर, जि. पुणे येथील कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, “नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम व आध्यात्मिक लोकशाहीतील सर्व संतांनी मराठी भाषेचा गौरव केला. कुसुमाग्रज, वि.स.खांडेकर, विंदा करंदीकर, डॉ. भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिकांनी व इतर अनेक साहित्यिकांनी आपल्या लेखनातून मराठी भाषा समृद्ध केली. मराठी भाषेचा गौरव करताना – अभिमान बाळगताना इतर भाषांचाही आदर करावा. शिक्षण हे परिसासारखे असून विद्यार्थ्यांच्या जीवनाला त्याचा स्पर्श झाल्यास त्याचे सोने होते. विद्यार्थ्यांचा मातृभाषेतून शिक्षणाचा पाया पक्का झाल्यास जगातील इतर कोणतीही भाषा त्याला आत्मसात करता येते. मराठी भाषा प्रत्येकाने जपली पाहिजे, वाढवली पाहिजे, शक्य तितके मराठीतूनच बोलले पाहिजे. पालकांनीसुद्धा आपल्या पाल्यांना साहित्य वाचण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. पुस्तकांचे वाचन केले नाही तर माणसाच्या जीवनाची रद्दी होईल. केवळ मराठी गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेचा अभिमान न बाळगता प्रत्येकाच्या वागण्यातून, विचारातून, कृतीतून तो दररोज दिसला पाहिजे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गणेश घोरपडे यांनी केले. “परभाषेतील शब्दांच्या प्रभावातून आपली मायमराठी आपण वाचवली पाहिजे” असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक बापूराव कदम यांनी केले. सर्वात शेवटी सर्व उपस्थितांचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख शिवाजी मोरे यांनी मानले.
सह्याद्री ग्रंथालयाच्यावतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त विद्यालयामध्ये निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले होते. ह्या स्पर्धेमध्ये दोनशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रा. गडकर यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सह्याद्रीवेडे सामाजिक संस्थेच्यावतीने विद्यालयासाठी वर्तमानपत्र वाचनाचे स्टॅंड भेट देण्यात आले. डॉ. श्रीराम गडकर यांनी विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी ‘सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील’ ‘(जी. ए. उगले) व ‘सुंदर प्रवास …’ (डॉ. श्रीराम गडकर) ही पुस्तके भेट दिली.
यावेळी संतोष कदम, बाळासो मोरे, महेमुद मुलाणी, सुनील कणसे, अमोल कणसे, मयूर काळभोर, अमित कणसे, पंकज जोरी, सुमंत काळभोर, दिनेश आठवले, विकास मस्के, अंबादास कांबळे, विशाल तुपे ,विकास वीर, मुरलीधर माने, संदीप पवार, इ. उपस्थित होते.