बाळशास्त्री जांभेकर जयंती शासन स्तरावर साजरी करण्याचे निर्देश

फलटण । मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना रविवार, दि.20 फेब्रुवारी 2022 रोजी जयंतीदिनी शासन स्तरावर अभिवादन करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने निर्गमित करण्यात आले आहेत.
दि.14 फेब्रुवारी रोजी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने प्रसिद्ध झालेल्या या परिपत्रकानुसार, रविवार, दि.20 फेब्रुवारी 2022 रोजी विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील / जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित करुन त्यांच्या अंमलबजावणीबाबत योग्य ती कार्यवाही करावी असे सूचित करण्यात आले आहे.
राष्ट्र पुरुष /थोर व्यक्ती यांची जयंती शासन स्तरावरुन साजरी होत असते.  महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या मागणीनुसार व सततच्या पाठपुराव्यामुळे शासनाच्या या यादीमध्ये बाळशास्त्रींच्या नावाचा समावेश गतवर्षीपासून झालेला आहे. त्याचअनुषंगाने सदरचे आदेश शासन स्तरावरुन निर्गमीत झाले असून याबद्दल महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी शासनास धन्यवाद दिले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने दि.20 फेब्रुवारी रोजी पोंभुर्ले (जि.सिंधुदुर्ग) येथील ‘दर्पण’ सभागृहात तसेच पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेत जयंतीदिनी बाळशास्त्रींना अभिवादन कार्यक्रम आयोजित केला असून शासनाबरोबरच राज्यातील पत्रकार संघटना, वृत्तपत्रप्रेमी नागरिक, सामाजिक संस्था यांनीही कोरोना संबंधीचे नियम पाळून जयंतीदिनी बाळशास्त्रींना अभिवादन करावे, असे आवाहन रविंद्र बेडकिहाळ यांनी केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!