पत्रकार मोहन मस्कर- पाटील यांचे हृदयविकाराने निधन

सातारा / प्रतिनिधी तब्बल अडीच दशके पत्रकारितेत सक्रिय असलेले  पत्रकार मोहन मस्कर- पाटील (वय ४४) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने पश्चिम महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील उत्साहाचा खळखळता झरा लुप्त झाला. 
मोहन मस्कर- पाटील यांचे पत्रकारिता क्षेत्रात मोठे योगदान असून, त्यांना राज्य शासनाचा पुणे विभागाचा नानासाहेब परुळेकर पत्रकारिता पुरस्कार, स्वच्छता अभियानांतर्गत निर्मल ग्राम अभियानाचा जिल्हा स्तरीय पुरस्कार मिळाला होता. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसह अनेक संस्थांच्या फेलोशीप त्यांना मिळाल्या होत्या. मुलगी नको असलेल्या कुटुंबात मुलीचे नाव ‘नकुसा’ ठेवले जात होते. त्याविरोधात मोहन पाटील यांनी विपुल लेखन करुन ही प्रथा समाजातून दूर होण्यासाठी काम केले. त्याची पडसाद राज्यभर उमटून ‘नकुसां’ची नावे बदलण्याची चळवळ उभी राहिली. त्याची दखल घेत त्यांना ‘लेक लाडली’चा पुरस्कार मिळाला होता. 
मराठी पत्रकारिता क्षेत्रात काम करताना त्यांनी राजकीय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रात विपुल लेखन केले. पत्रकारितेच्या मूल्यांचे जतन करत त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमठवला. रंजल्या, गांजलेल्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी नेहमीच तीव्रतेने लेखन केले. याशिवाय, समाजातील बदल अचूकपणे टिपून केलेले लेखन समाजाला दिशा देणारे ठरले आहे. 
 मोहन यांच्या निधनाने साताऱ्यास पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, चळवळीच्या क्षेत्राचे नुकसान झाले. त्यांच्या जाण्याने तब्बल अडीच दशकांचा अनुभव हरपला आहे. त्यांची पत्रकारिता उदयोन्मुख पत्रकारांसाठी सदैव मार्गदर्शक, दिशादर्शक ठरणारी आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली असून, त्याची परिणामही दूरगामी झाले आहेत. ते सध्या पुण्यनगरी’च्या सातारा कार्यालयात उपसंपादक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी लोकमत, तरुण भारत या दैनिकांत काम केले आहे. 
मोहन यांचे मूळ गाव चिंचेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली असून, ते सध्या सातारा येथील समर्थ मंदिर परिसरात राहत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. त्यांच्यावर चिंचेवाडी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!