फलटण (प्रतिनिधी) : फलटण श्रीराम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सध्या सुरु असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दि.२१ जानेवारी पर्यंत १३ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आणि आज दि.२४ रोजी छाननीत हे सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत, त्यामुळे सदर संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली असे समजण्यास हरकत नाही, तथापी दि.८ फेब्रुवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून त्यानंतरच हे सर्व १३ संचालक बिनविरोध विजयी झाल्याची अधिकृत घोषणा होईल.
राजघराण्यातील अलीकडच्या तिसऱ्या पिढीने सक्रिय राजकारणास महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सन १९९१ मध्ये सुरुवात केली त्यावेळी सन १९२६ मध्ये स्थापन झालेल्या, शताब्दीकडे वाटचाल सुरु असलेल्या श्रीराम विविध कार्यकारी सेवा सोसायटीत परिवर्तन घडवून आणण्याचा चंगच नव्याने उभारी घेणाऱ्या राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी बांधला आणि त्याची सुरुवात श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे यांनी स्व.श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांचे आशिर्वाद घेवून या संस्थेच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकीत राजे गटाने सक्रीय सहभागी होवून आपले उमेदवार उभे केले, त्यामध्ये श्रीमंत संजीवराजे यांचा समावेश होता. राजे गटाच्या श्रीराम पॅनलने मोठ्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकली आणि श्रीमंत संजीवराजे या संस्थेचे चेअरमन झाले, अवघ्या ५ वर्षात त्यांनी संस्थेची आर्थिक स्थिती बदलली आणि टप्प्याटप्प्याने संस्था आर्थिक निकषांवर उत्तम संस्था बनली, तेंव्हा पासून आजअखेर गेली ३० वर्षे ही संस्था राजे गटाकडे असून उत्तम आर्थिक स्थिती, सतत अधिक कर्ज पुरवठा, वसुलीत आघाडी घेऊन कार्यरत आहे.
त्यानंतरच्या गेल्या २५/३० वर्षात लोकांनी एकेक संस्था राजेगटाकडे विश्वासाने सुपूर्द केल्या, नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, श्रीराम सहकारी साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघ, तालुक्यातील ग्रामपंचायती, विकास सोसायट्या आणि विधानसभा निवडणूकीतही फलटणकरांनी राजे गटाला आपले मानून त्यांचे उमेदवार विजयी केले.
त्यामुळे धोम-बलकवडी, नीरा-देवघर ही दोन धरणे उभी राहिली, नदी नाल्यांवर बंधारे, पाझर तलाव उभे राहिल्याने पूर्वी केवळ ३५ गावे बागायती असलेल्या फलटण तालुक्यात आता सर्व गावात पाटबंधारे व विहिरींचे पाणी पोहोचले असून तालुका आगामी काळात १००% बागायत होणार आहे.
औद्योगिक वसाहत उभारणी, नागरी सुविधांचा विस्तार, दर्जेदार शैक्षणिक सुविधा, तरुणांना नोकऱ्या व उद्योग व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन देण्यात राजे गट यशस्वी झाला असून या सर्वांची सुरुवात फलटण श्रीराम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी पासून सुरुवात झाली असल्याने या सोसायटीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान १३ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करुन बिनविरोध निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यासाठी उत्सुक असलेले १३ संचालकांमध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सह प्रमोद आनंदराव खलाटे, सुभाष दिनकर भोसले, उदयसिंह भाऊसाहेब जाधव, शंतनू कमलाकांत भोसले, अँड.विजयराव भिकोबा नेवसे, शाम शिवाजीराव कापसे, शिरीष माणिकराव पवार, सौ.सोनाली शरद जाधव, सौ.निलम विजयकुमार लोंढे-पाटील, प्रकाश बबनराव भोंगळे, संजय यशवंत चोरमले, सुनिल आबाजी अहिवळे यांचा समावेश आहे.